
लासलगाव : वार्ताहर
शेतकरी बांधवांचा जिव्हाळ्याचा सण असलेल्या पोळ्याच्या पार्श्वभूमीवर लासलगावसह वेळापूर परिसरातील कुंभार समाजबांधवांची लगबग वाढली आहे. मातीपासून आकर्षक बैलजोड्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पारंपरिक पद्धतीने तयार होणार्या या मातीच्या बैलांना पोळ्यानिमित्त ग्रामीण भागात मोठी मागणी असते.
वेळापूर येथील कुंभार मिन्नात उत्तम भागवत व त्यांच्या परिवारातील सदस्य गेल्या काही दिवसांपासून मातीची निवड, माती मळणे, बैलांचे साचे तयार करणे, त्यांना आकार देणे, वाळवणे तसेच रंगकाम करण्याच्या कामात व्यस्त आहेत. बैलांना आकर्षक रंग देऊन त्यावर विविध नक्षीकाम केले जात आहे. सजावटीसाठी रंगीबेरंगी साहित्याचाही वापर केला जात आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आकर्षित करणार्या या बैलजोड्या बाजारात विक्रीसाठी सज्ज होत आहेत. येत्या 10 सप्टेंबरला पोळा सण साजरा होणार आहे. पोळा सणाच्या दिवशी शेतकरी बैलांची पूजा करून त्यांना सजवतात. मातीच्या बैलांचीही विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे. त्यामुळे दरवर्षी पोळ्याच्या काही दिवस आधी कुंभार समाज बांधवांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळते. शहरीसह ग्रामीण भागात मातीच्या बैलांचे पारंपरिक महत्त्व आजही कायम आहे. या व्यवसायातून कारागिरांना रोजगार मिळतो, त्यांच्या पारंपरिक कलेचे जतनही होतेे.
मातीपासून बैल तयार करण्याची कला ही कुंभार समाजाची पारंपरिक ओळख आहे. या पारंपरिक कलेचे जतन आजही आमच्या कुटुंबाकडून होत आहे. मात्र, वाढती महागाई, कच्च्या मालाचा खर्च आणि बदलत्या बाजारपेठेमुळे या व्यवसायासमोर आव्हाने निर्माण झाली आहेत.
– मिन्नात भागवत, वेळापूर
Work on making clay bulls is in the final stage.