– राजेश शिरभाते
महाराष्ट्राचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणाच्या आधीच हा सण साजरा करण्याच्या पद्धतीबाबत मोठी चर्चा सुरु झाली आहे. महाराष्ट्राच्या ज्या पुण्यातून लोकमान्य टिळकांनी युवकांना एकत्र आणण्यासाठी या सणाची सार्वजनिक स्तरावरील सुरुवात केली त्याच पुण्यातून या सणाच्या सध्याच्या स्वरुपाविषयी चर्चा सुरु होत आहे हे विशेष. तसेही पुणे सध्या अनेक गोष्टींनी गाजत आहे.
पुणे पोलिसांची नोंद तर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. त्यांनी एका महिलेची तक्रार दाखल करून घेतल्यानंतर काही मिनिटांत एका अत्यंत क्रूर असलेल्या आणि गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देत असलेल्या गुन्हेगाराला मध्यरात्री अटक केली आहे. त्याबद्दल महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे यापुढे पुण्यातील लोक पहिल्यांदा सुखाची झोप घेणार आहेत.
गणेशोत्सवाची मूळ कल्पना ही ब्रिटिशांच्या विरोधात लढणार्या तरुणांना एकत्र आणण्यासाठी द्यावयाच्या धार्मिक व्यासपीठाच्या स्वरूपात झाली. या ठिकाणी होणार्या कार्यक्रमांमधून राष्ट्रप्रेमाची आणि ब्रिटिशांच्या विरोधात लढण्याची प्रेरणा दिली जात असे. सर्वांना एकत्र आणले जात असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या उत्सवाने समाजप्रबोधनाचे आपले काम सुरूच ठेवत त्याला सांस्कृतिक वारसा आणि कलांना जिवंत ठेवण्याचे माध्यम बनवले. सणाचा उत्साह कायम ठेवून त्यात सामाजिक आशय जपण्याचा हा प्रयत्न सर्वांनाच भावत होता. या गणेशोत्सवाच्या व्यासपीठावरून अनेक नव्या कलाकारांना संधी मिळत होती. स्थानिक पातळीवरच्या कलाकारांना प्रेक्षकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळत होती. त्यानंतर एकेका गणेशोत्सव मंडळाची अनेक मंडळे होत गेली. त्यातून मग या मंडळांमध्ये स्पर्धा सुरू झाली. त्यानंतर हा सामाजिक आशय काहीसा मागे पडला. त्याची जागा श्रद्धेने घेतली. नवसाला पावणारा आणि इच्छा पूर्ण करणारा गणेशोत्सव सुरू झाला. साहजिकच त्याला मोठी गर्दी होऊ लागली. आपल्या इच्छा पूर्ण झालेले भाविक या मंडळांना मोठ्या प्रमाणात देणग्या देऊ लागले. त्यातून देवांच्या श्रीमंतीचीही एक सुप्त स्पर्धा सुरू झाली. या उत्सवात सामील झालेल्या तरुणांच्या उत्साहाला व ऊर्जेला वाट देण्यासाठी मिरवणुका आल्या. त्याचा काळ आणि त्यांचे स्वरूप बदलले. या मिरवणुकाही मोठ्या विशेष असायच्या. मला अमरावती शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक आठवते. तेव्हा प्रत्येक मंडळ आपले गणपती आणि त्यासोबत चित्ररथ घेऊन या मिरवणुकीत सहभागी होत. ही मिरवणूक राजकमल या शहराच्या त्यावेळी मध्यभागी असलेल्या चौकात येत असे. त्यानंतर ती पुन्हा माघारी फिरून विसर्जनाकडे मार्गक्रमण करत असे. ही मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण अमरावती त्या दिवशी रस्त्यावर आलेली असे. पुण्याची विसर्जन मिरवणूक आणि त्याला लागलेला वेळ. तेथील ढोल आणि इतर पारंपरिक वाद्यांची पथके हीही काही वर्षांपूर्वी कौतुकाचा विषय होती. इतरही शहरांमध्ये अशाच प्रकारची पद्धत होती. त्यानंतर मग पारंपरिक वाद्यांची जागा डीजेने घेतली. त्यानंतर मग डीजेनेी या उत्सवाला जवळजवळ गिळंकृत केले. त्यातही किती मोठी भिंत तयार करायची याची एक स्पर्धा सुरू झाली. पुण्यातील विद्यानंद बापट या उच्चविद्याभूषित गृहस्थाने या डीजेविरोधात सध्या आवाज उठवला आहे. त्यांना डीजेवाल्यांच्या कमिशनवर जगणार्यांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. त्यातही एका पन्नास रुपयांत विकल्या गेलेल्याने तर थेट बापट यांना कानशिलात लगावली. आता बापट पडले सुशिक्षित. हा मारणारा पडला कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि काही पैशांच्या आशेने आलेला अशिक्षित. त्यामुळे त्याला कोणी इतके गंभीरपणे घेतले नाही. विद्यानंद बापट यांच्या भूमिकेला मात्र समाजातील सभ्य आणि सुसंस्कृत लोकांच्या स्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. कोणत्याही सणाच्या उत्साहावर कोणाचा काहीही आक्षेप असण्याचा प्रश्न नाही. मात्र, आपल्या उत्साहाने इतरांना त्रास होणार नाही ना, याचा विचार व्हायला हवा. तो सध्या होत नाही. त्यात प्रत्येक गोष्टीत धर्म आणून प्रत्यक्षात केवळ गुंडागिरीचा व्यवसाय करणार्यांची संख्या वाढत आहे. कोणताही धर्म कधीही कोणालाही त्रास द्यायला सांगत नाही. याआधीही अनेक वर्षे मोठ्या आनंदात सण साजरे झाले आहेत. त्याच्या स्वरूपात बदल झाले आहेत. नव्या नव्या कल्पना राबवण्यात आलेल्या आहेत. तेव्हा कधी कोणाला त्रास झाला नाही. आत्ताच कसा काय या लोकांचा धर्म धोक्यात येतो, या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडेही नाही.
सण किंवा उत्सव हा अधिकाधिक लोकांना सामावून घेणारा उत्सव आहे. त्यात अनेकांचा विचार केला जातो. लोकांना आनंद व्हावा व तो घेता यावा याचा विचार केला जातो. आपल्या नसलेल्या मोठेपणासाठी लोकांना गृहित धरून त्रास देणारा सण वा उत्सव नसावा. यामुळे सणाचे धार्मिक अधिष्ठान नाहीसे होते. पात्रित्र्य नाहीसे होते. उरतो तो केवळ दिखावा. महाराष्ट्र हा पुरोगामी आणि विचारवंतांची भूमी आहे. प्रत्येक काळात महाराष्ट्रात चिकित्सा होत आलेली आहे. ती परंपरा पुढे घेऊन जाणार्या विद्यानंद बापटांचे अभिनंदनच केले पाहिजे. त्यांना विरोध करणारे किंवा त्यांना विरोध करण्याची सुपारी घेणार्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. हिंदू धर्म हा मोठा धर्म आहे. त्यातील सणांची व उत्सवांची चिकित्सा होत राहणार. त्यात बदल होत राहणार. हा धर्म मोठा आहे. तो मोठाच होत राहणार. केवळ त्याचा ठेका घेतल्याचा धंदा करणार्यांनी थोडा अधिक विचार करायला हवा.
The festive spirit