पहिली फुटलेली खिडकी आणि विद्रूप होत चाललेले नाशिक!

– वाहिद बागवान

एखाद्या देखण्या इमारतीची एक साधी खिडकी फुटते, दिवस जातात, पण ती बदलली जात नाही; मग लोकांना वाटते की, इथे कोणाचेच लक्ष नाही, हळूहळू दुसरी खिडकी फोडली जाते, भिंती रंगवल्या जातात आणि बघता बघता एका सुंदर वास्तूचा खंडहर होतो… समाजशास्त्रज्ञ जेम्स विल्सन आणि जॉर्ज केलिंग यांनी 1982 मध्ये मांडलेला हा ‘ब्रोकन विंडोज सिद्धांत’ आज नाशिकच्या रस्तोरस्ती उघड्या डोळ्यांनी अनुभवायला मिळतो आहे. नाशिकचे संकट हे निधीच्या अभावाचे नसून, त्या पहिल्या फुटलेल्या खिडकीकडे- म्हणजेच त्या पहिल्या लहानशा अस्वस्थ करणार्‍या विद्रूपतेकडे-दुर्लक्ष करण्याच्या सार्वत्रिक मानसिकतेचे आहे. पाच हजार वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या मोहेंजोदडो आणि हडप्पाने जगाला शिकवले होते की, शहराचे श्रेष्ठत्व गगनचुंबी रचनेत नसते, तर जमिनीखालून वाहणार्‍या बंदिस्त गटारांत, काटकोनातील सरळ रस्त्यांत आणि सार्वजनिक आरोग्याच्या अचूक शिस्तीत असते. एकेकाळी गुलमोहर, बोगनवेल आणि चाफ्याच्या सुगंधात न्हाऊन निघणारे, निसर्गाने मुक्तहस्ते नटवलेले हे ‘फुलांचे शहर’ आज स्वतःच्याच अनास्थेच्या चक्रव्यूहात अडकून त्या प्राचीन नगररचनेच्या वारशापासून पार कोसो दूर फेकले गेले आहे.
कवी विल्यम शेक्सपिअर यांनी आपल्या एका सुनीतात नेमकी याच पतनाची मांडणी केली होती- For sweetest things turn sourest by their deeds; Lilies that fester smell far worse than weeds (अतिशय सुकुमार आणि सुंदर गोष्टींची जर वेळेत निगा राखली नाही, तर सडलेल्या लिलीच्या फुलांची दुर्गंधी ही रानटी गवतापेक्षाही अधिक भयानक असते). प्रभू रामचंद्रांची तपोभूमी, कुंभमेळ्याची वैश्विक प्रतिष्ठा आणि आधुनिक ‘वाइन कॅपिटल’ असा नावलौकिक मिरवणार्‍या नाशिकमध्ये आज या ‘सडणार्‍या फुलां’चे दृश्य जागोजागी दिसते. रस्त्यांवरील खड्डे आणि उघड्या गटारींवरचे हलणारे तुटलेले ढापे तर रोजच्या अंगवळणी पडले आहेतच, पण ‘ब्रोकन विंडोज’ सिद्धांताची खरी सुरुवात होते ती जे घटक सरळ, देखणे व सुस्थितीत असायला हवेत त्यांच्या विद्रूपतेतून. रस्त्यांच्या कडेला मान टाकल्यासारखे झुकलेले पाथदिवे, वाकलेले सिग्नलचे खांब, फुटून मातकट झालेले रस्ते दुभाजक, धुळीने माखलेली वाहतूक बेटे आणि एखाद्या चौकाची अस्मिता म्हणून उभारलेली स्मारके आज पडक्या विटांनी, काळवंडलेल्या रंगांनी आणि घासलेल्या कोपर्‍यांनी उभी आहेत. ही केवळ मोडतोड नाही, तर व्यवस्थेने आणि नागरिकांनी एकत्रितपणे दिलेला हा मूक संदेश आहे की, ‘आम्हाला या शहराची पर्वा नाही!’
एकदा का दुर्लक्षाचा हा संदेश वातावरणात पसरला, की विद्रूपतेची साखळी वेगाने विस्तारते.
उद्यानांमधील गंजून लोंबकळणारी बालकांची खेळणी, जॉगिंग ट्रॅकवर उभारलेल्या ‘ग्रीन जिम’मधील उखडलेली साधने, कचर्‍याच्या साम्राज्यात अडकलेली खेळांची विस्तीर्ण मैदाने आणि जुनाट व्यायामशाळा तरुण पिढीच्या उत्साहावर पाणी फेरतात. वर्षानुवर्षे रंगाविना काळवंडलेले महाकाय जलकुंभ आणि त्यावर निर्धास्तपणे चढलेली रानटी झुडपे, उघड्या पडलेल्या धोकादायक विद्युत डीपींवरून पसरलेल्या वेली, डांबरी रस्त्यांवरून पुसट झालेले झेब्रा क्रॉसिंग, पादचार्‍यांना अडखळवणारे पेव्हर ब्लॉक आणि वाकलेले, गंजलेले अर्धवट दिशादर्शक फलक हे सर्व एकाच आजाराची लक्षणे आहेत. कुजत पडलेला पालापाचोळा वेळेत न उचलल्यामुळे तिथे कचर्‍याचा ढीग होतो; दुर्गंधीयुक्त सार्वजनिक शौचालयांकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्यांच्या कडेला घाण करणे सामान्य मानले जाते आणि रस्त्यांच्या कडेला कुजत उभ्या असलेल्या बेवारस भंगार गाड्या, न रंगावलेल्या सरकारी इमारती आणि बेशिस्त पार्किंग संपूर्ण नागरी व्यवस्थेला बधिर करून टाकतात.
जागतिक नगररचनाकार लुईस ममफोर्ड यांनी म्हटले होते, शहराचे अंतिम काम माणसाच्या अस्तित्वाला भव्यता देणे आणि त्याच्या दैनंदिन जगण्यात शिस्त व सौंदर्याचे संस्कार रुजवणे हे असते. टोकियो, सिंगापूर किंवा क्युरिटिबा या शहरांनी ‘ब्रोकन विंडोज’च्या धोक्याला वेळीच ओळखले. तिथे एकाही सिग्नलचा खांब वाकलेला राहत नाही, कुठेही पादचारी मार्गाचा एक ब्लॉक निखळला तर तो काही तासांत पूर्ववत केला जातो. या सूक्ष्म नीटनेटकेपणामुळे तिथल्या नागरिकांचा मानसिक ताण कमी होतो, अपघातांची शक्यता घटते आणि लोकांच्या वर्तनात नैसर्गिक नागरी शिस्त निर्माण होते. महात्मा गांधींचा स्वच्छतेचा आग्रह हा केवळ झाडू मारण्यापुरता नव्हता, तर तो प्रत्येक सार्वजनिक घटकाचा आत्मसन्मान जपण्याचा विचार होता. नाशिकची जागतिक कीर्ती आणि येथील प्रत्यक्ष राहणीमान यांचा मेळ घालायचा असेल, तर आता उड्डाणपुलांच्या घोषणांइतकेच महत्त्व त्या पहिल्या झुकलेल्या खांबाला सरळ करण्याला, पहिल्या तुटलेल्या बाकाला दुरुस्त करण्याला आणि पहिल्या उखडलेल्या पेव्हर ब्लॉकला जागच्या जागी बसवण्याला द्यावे लागेल.
प्रशासनाने अशा लहानसहान दुरुस्त्यांसाठी तत्काळ कृती करणारी संवेदनशील कार्यसंस्कृती अंगीकारणे ही काळाची गरज आहे, तर नागरिकांनीही सार्वजनिक जागांना ‘कोणाचीच नाही’ म्हणून ओरबाडण्याऐवजी स्वतःच्या घरासारखे जपणे अनिवार्य आहे. एक समृद्ध जागतिक शहर केवळ सिमेंटच्या महाकाय चौकटीतून जन्माला येत नाही, तर तेथील सूक्ष्म निगा आणि सार्वजनिक सौंदर्यदृष्टीतून आकाराला येते. शहराच्या विद्रूपतेची सुरुवात जशी एका छोट्या दुर्लक्षाने होते, तसेच त्याच्या सौंदर्याचे पुनरुज्जीवनही त्या पहिल्या ‘फुटलेल्या खिडकी’च्या दुरुस्तीतूनच होऊ शकते. हाच सुव्यवस्थेचा, नीटनेटकेपणाचा आणि संवेदनशीलतेचा दृष्टिकोन आपल्याला पुढच्या पिढीला वारसा म्हणून द्यावा लागेल; कारण आपण जसे शहर घडवतो, शेवटी तेच शहर आपले जगणे, आपले वर्तन आणि आपले भविष्य घडवत असते.

 

The first broken window and a disfiguring Nashik!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *