शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा: डॉ. अपूर्व हिरे
नाशिक : महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेतील म्युनिसिपल ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक सोपान बोरसे यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात मी स्वतः तसेच संपूर्ण हिरे कुटुंबीय सहभागी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना भविष्यात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची आमची भूमिका राहील, अशी भावना समन्वयक डॉ. अपूर्व प्रशांत हिरे यांनी व्यक्त केली.
संस्थेच्या व्यवस्थापनासंदर्भात शिक्षण विभागाकडून सुरू असलेल्या चौकशीबाबत संस्थेची कोणतीही हरकत नाही. संबंधित यंत्रणांनी संस्थेची किंवा व्यवस्थापनाची जी चौकशी करावयाची आहे ती नियमांनुसार व निष्पक्षपणे करावी; त्या चौकशीला आवश्यक ते संपूर्ण सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. संस्थाचालकांशी संबंधित कोणतीही चौकशी किंवा कारवाई करावयाची असल्यास आम्ही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहोत. मात्र, संस्थेच्या व्यवस्थापनासंदर्भातील चौकशीच्या नावाखाली सामान्य शिक्षकांना वारंवार चौकशीसाठी बोलावणे, त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करणे आणि त्यांची छळणूक करणे, हा प्रकार तातडीने थांबला पाहिजे.
प्रा. बोरसे यांच्यासारख्या सामान्य शिक्षकाला संस्थेच्या व्यवस्थापनासंदर्भातील चौकशीमध्ये अनावश्यकपणे वेठीस धरले जाऊ नये. शिक्षक हा आपले शैक्षणिक व अध्यापनाचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणारा घटक आहे. व्यवस्थापनासंदर्भातील चौकशी करायची असल्यास ती संबंधित स्तरावर करण्यात यावी. मात्र, त्यासाठी सामान्य शिक्षकांना वारंवार प्रश्नोत्तरांसाठी बोलावणे, सलग अनेक दिवस चौकशीच्या प्रक्रियेत ठेवणे, त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करणे अथवा त्यांना त्रासाला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण करणे, हे अत्यंत गंभीर आहे.
प्रा. सोपान बोरसे यांच्यावर सलग चार दिवस सुरू असलेल्या चौकशीची पद्धत, त्यामागील कारणे, संबंधित अधिकार्यांनी घेतलेले निर्णय आणि त्या प्रक्रियेमुळे त्यांच्यावर निर्माण झालेला मानसिक दबाव, या सर्व बाबींची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे.
शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही संस्थेकडून गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. वारंवार चौकशीच्या माध्यमातून शिक्षकांवर दबाव निर्माण करणे, त्यांना सातत्याने प्रश्नोत्तरांसाठी सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण करणे आणि संबंधित शिक्षकाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागणे, या सर्व बाबींची अत्यंत गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक आहे.
संस्थेची किंवा व्यवस्थापनाची चौकशी करण्यास आमचा कोणताही विरोध नाही. आम्ही चौकशीसाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, चौकशीच्या नावाखाली सामान्य शिक्षकांवर दबाव आणणे, त्यांची वारंवार चौकशी करणे आणि त्यांना मानसिक त्रास देणे कदापि मान्य केले जाणार नाही. सामान्य शिक्षकांचा या प्रकारे होणारा मानसिक छळ तातडीने थांबला पाहिजे, ही आमची ठाम भूमिका आहे.
या संपूर्ण प्रकरणात शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी आपल्या पदाचा किंवा प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर केला का, प्रा. सोपान बोरसे यांच्यावर अनावश्यक व असह्य मानसिक दबाव निर्माण करण्यात आला का आणि त्या दबावाचा त्यांच्या दुर्दैवी मृत्यूशी संबंध आहे का, याची निष्पक्ष, स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आमची ठाम मागणी आहे.
या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, येत्या मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी स्वतः भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करणार आहे. प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची भूमिका, चौकशीची संपूर्ण प्रक्रिया आणि प्रा. बोरसे यांच्यावर निर्माण झालेल्या मानसिक दबावाची स्वतंत्र व सखोल चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे करण्यात येईल.
आमच्या संस्थेतील शिक्षक हे केवळ कर्मचारी नसून आमच्या परिवाराचाच एक भाग आहेत. त्यामुळे कोणत्याही शिक्षकावर अन्याय होत असेल, त्यांच्यावर अनावश्यक दबाव आणला जात असेल किंवा त्यांची छळणूक होत असेल, तर संस्था आणि हिरे परिवार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.
An inquiry into Prof. Borse’s death should be conducted, and strict action taken against the guilty.