मनपाच्या घनकचरा विभागाची तयारी
नाशिक : प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळांनी तयारी सुरू केली आहे. गणेशोत्सवात हजारो भाविकांची गर्दी होत असल्याने अशावेळी कुठेही कचरा व अस्वच्छता होऊ नये याकरिता महापालिकेच्या घनकचरा विभागाने दिवस व रात्रीच्या सत्रात वाढीव घंटागाड्यांचे नियोजन केले आहे. अधिकृत नोंदणी असलेल्या गणेश मंडळांनी वाढीव घंटागाड्यांंची मागणी केल्यास तेथे घंटागाडी जाणार असल्याची माहिती घनकचरा विभागाने दिली.
गणेशोत्सवाच्या काळात शहरांत निर्माण होणार्या अतिरिक्त कचर्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकांकडून वाढीव घंटागाड्यांची विशेष व्यवस्था केली जाणार आहे. फुले, हार, पाने, नारळ आणि पूजासाहित्य मोठ्या प्रमाणावर निर्माल्य म्हणून जमा होते. त्यामुळे नागरिकांनी निर्माल्य स्वतंत्रपणे महापालिकेच्या संकलन यंत्रणेकडे देणे अपेक्षित आहे. त्यासाठी शहरातील सार्वजनिक गणेश मंडळे आणि घरगुती गणेशमूर्तींच्या ठिकाणी घंटागाड्यांच्या माध्यमातून संकलन करण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
दरम्यान, सार्वजनिक मंडळे आणि निवासी भागांतून निघणारा कचरा वेळेवर उचलला जावा, यासाठी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून विशेष नियोजन केले जाते. नियमित वेळेव्यतिरिक्त विशेषतः संध्याकाळी व रात्रीच्या वेळी घंटागाड्यांच्या अतिरिक्त फेर्या केल्या जाऊ शकतात. मुख्य गणेशोत्सव मंडळे, देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ठिकाणी कचरा लवकर साचतो. अशा ठिकाणी महापालिकेच्या गाड्या दिवसातून दोन ते तीन वेळा कचरा गोळा
करतात.
शहरातील गर्दी पाहता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेकदा वाढीव घंटागाड्या पहाटे किंवा मध्यरात्रीच्या वेळी चालवल्या जातात.
गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांसमवेत उद्या बैठक
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव-2026 च्या अनुषंगाने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान सदर बैठक आज बुधवारी (दि.9) दुपारी 3.30 वाजता आयोजित करण्यात आली होती. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव बैठकीच्या वेळेत बदल केल्याने आता ही बैठक गुरुवारी (दि. 10) सकाळी 11 वाजता होणार आहे. सदर बैठकीस महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री उपस्थित असतील. बैठकीस शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, तसेच संबंधित प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पीओपी गणेशमूर्तींसाठी विसर्जन व्यवस्था
यंदा पीओपी गणेशमूर्तींबाबत कठोर पावले उचलली गेली नसली, तरी पर्यावरणाच्या द़ृष्टीने मनपाकडून पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता तयारी केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड ते अमोनियम पावडर उपलब्ध करून दिली जाणार आहे. महापालिकेकडे स्वीकारण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी बांधकाम विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि नदीसंवर्धन विभाग यांचे संयुक्त पथक कार्यरत राहील.
गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांसाठी घंटागाड्यांच्या फेर्या किंवा स्वतंत्र घंटागाड्या वाढवून दिल्या जातील. नोंदणीकृत मंडळांसाठी ही सुविधा केली जाईल. सध्या शहरात रात्रीच्या वेळी एकूण बारा घंटागाड्यांद्वारे कचरा उचलाला जातो.
– डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा विभाग, मनपा
Arrangements for additional garbage collection vehicles during Ganeshotsav