गणेशोत्सवात एक मंडळ, एक पोलीस

संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ माहिती द्या : कर्णिक

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
आगामी गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. यंदा ‘एक मंडळ, एक पोलीस’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. गणेशोत्सव काळात मंडळाच्या परिसरात अथवा देखावे पाहण्यासाठी येणार्‍या नागरिकांमध्ये कोणतीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले.
सध्या शहरात 1100 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांच्या माध्यमातून कार्य सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त पाच हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. होऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड, देवळाली कॅम्प व उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील सार्वजनिक गणपती उत्सव समित्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची बैठक नाशिकरोड पोलीस ठाण्यातील दारणा सभागृहात पार पडली.
यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी महिला, मुली तसेच मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यामुळे मंडळांनी सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घ्यावी. मंडळांनी महावितरणकडून अधिकृत विद्युतजोडणी करून घ्यावी. अनधिकृत विद्युत जोडण्यांमुळे दुर्घटना होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
मंडळांनी पोलिस विभागाला सहकार्य करावे आणि पोलिसांनीही मंडळांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सहकार्याची भूमिका ठेवावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी विविध समस्या मांडल्या. श्याम गोहाड यांनी स्मार्ट सिटीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करून ते तातडीने सुरू करावेत, तसेच गणेशोत्सव काळात पुरेसा पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली.
सुरेखा निमसे यांनी खोदलेले रस्ते तसेच नाले दुरुस्त करण्याची मागणी केली. आकाश भालेराव यांनी एकाच रस्त्याचे चार-पाच वेळा खोदकाम केले जात असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. महावितरण विभागाने डीपीला योग्य झाकणे बसवून संभाव्य अपघात टाळावेत, अशी मागणी केली.
चंद्रकांत महानुभव यांनी महावितरणच्या परवानगीसाठी गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार केली. मनपा विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांनी महापालिकेच्या वतीने सांगितले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या महापालिकेकडून रस्ते खोदकामास बंदी आहे. यापूर्वी खोदण्यात आलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
महावितरणचे अभियंता सुरेश पाचंगे यांनी गणेश मंडळांच्या वतीने विद्युतजोडणीसाठीचे अर्ज विद्युत भवन येथे स्वीकारले जातील, अशी माहिती दिली. तसेच गणेश मंडळांना प्रीपेड मीटर उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी मागील काळाच्या तुलनेत तक्रारींचे प्रमाण कमी असल्याचे सांगितले. प्राप्त होणार्‍या तक्रारींची पोलिसांकडून दखल घेतली जाईल. गणेशोत्सवाच्या काळात अमली पदार्थांविरोधात जनजागृती करावी. यंदाही अमली पदार्थविरोधी संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. नाशिकरोड परिसरात नेहमीप्रमाणे सामाजिक सलोखा कायम राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
नाशिक शहर गणेश मंडळाचे अध्यक्ष समीर शेठे यांनी गणेश मंडळांच्या विविध अडचणी महापालिकेसमोर मांडण्यात येतील, असे सांगितले.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणार्‍या शौचालयांचा गणेशोत्सव काळात गणेश मंडळांना वापर करता येणार असल्याचे सांगून मंडळांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रशासनाकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी केले. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवाडे यांच्यासह परिसरातील विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

One Mandal, One Police Officer during Ganeshotsav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *