दोन लाख 14 लाखांचा मुद्देमाल जप्त
सिडको : प्रतिनिधी
नाशिक शहर अमली पदार्थविरोधी पथकाने म्हसरूळ परिसरात कारवाई करत 56 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थासह दोन तरुणांना अटक केली. या कारवाईत मोटारसायकल आणि इतर साहित्य असा एकूण दोन लाख 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांपैकी दर्शन गोरख गायकवाड हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिक शहरात नशामुक्त भारत अभियानांंतर्गत अमली पदार्थांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर 7 सप्टेंबर रोजी अमली पदार्थविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे पथकासह गस्त घालत होते. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अश्वमेधनगर येथील रिक्षा स्टँडसमोर, नामको हॉस्पिटलजवळील मोकळ्या मैदानात दोन जण मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या उभे असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पोलिसांना पाहताच दोघांनी मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांची नावे दर्शन गोरख गायकवाड (वय 23), रोशन दिनकर लोखंडे (23, दोन्ही रा. कोळीवाडा, मातोरी गाव) अशी असल्याचे समोर आले. पंचांसमक्ष झडती घेतली असता दर्शन गायकवाड याच्या पॅन्टच्या खिशात 56 ग्रॅम एमडी आढळले. त्याची किंमत एक लाख 68 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. मोटारसायकल व इतर साहित्य मिळून दोन लाख 14 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Two arrested with 56 grams of MD in Nashik.