भद्रकालीत रिक्षाचालकावर धारदार वस्तूने हल्ला

वाहतूक कोंडीवरून झाला वाद; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

सिडको : प्रतिनिधी
वाहतूक कोंडीवरून झालेल्या वादात मित्राला वाचवण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावर धारदार लोखंडी वस्तूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात आकाश बांडे आणि विनायक रावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदिम अबरार शेख (वय 33, रा. पंचशीलनगर, भद्रकाली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी शेख सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांचा मित्र अरबाज अनवर मनियार (वय 29) याच्यासोबत पंचवटी येथून रिक्षाचे भाडे सोडून सरस्वती लेन येथील महापालिकेच्या सुलभ शौचालयासमोर आले होते.
यावेळी वाहतूक कोंडी झाल्याने अरबाज याने मोटारसायकलवरून जाणार्‍या दोन व्यक्तींना गाडी थोडी पुढे घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्याने दोघांनी अरबाजला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. शेख भांडण सोडवण्यासाठी गेले असता, संशयितांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
यावेळी विनायक रावडे याने हातातील लोखंडी धारदार वस्तूने शेख यांच्या डोक्यावर तीन ते चार वार केले. तसेच त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांजवळही मारून दुखापत केली. अरबाज यालाही धारदार वस्तूने दुखापत करण्यात आली. त्यानंतर दोन्ही संशयित घटनास्थळावरून पसार झाले.
या घटनेप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक माळी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Rickshaw driver attacked with a sharp object in Bhadrakali.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *