नाशिक : प्रतिनिधी
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन ऐन दिवाळीच्या सणात होणारी 15 टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रवाशांवर आर्थिक भर पडू नये म्हणून एसटी महामंडळाने यंदाची हंगामी परिवर्तनशील भाडेवाढ पूर्णपणे स्थगित केली आहे. त्यामुळे यंदा प्रवाशांना कोणत्याही दरवाढीविना नेहमीच्या नियमित तिकिटातच दिवाळीचा प्रवास करता
येणार आहे.
दरवर्षी दिवाळीत नोकरदार, व्यावसायिक सणानिमित्ताने आपल्या गावी जातात. गाव दूर असो वा जवळ सुरक्षित प्रवासासाठी लालपरीचीच निवड केली जाते. गर्दीच्या मौसमात एसटीकडून हंगामी भाडेवाढ करण्यात येत असते. दरवर्षी 15 टक्क्यांपर्यंत ही दरवाढ केली जाते. परंतु, राज्यात अनेक भागात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती विचारात घेत परिवहन विभागाने ही परिवर्तनशील भाडेवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागीय पातळीवरूनही यासंदर्भात कोणताही भाडेवाढीचा प्रस्ताव लागू करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हंगामी भाडेवाढ स्थगित केली आहे.त्यामुळे सध्यातरी कोणतीही भाडेवाढ होणार नाही.
– भगवान जगनोर, वाहतूक नियंत्रक, नाशिक विभाग
No hike in ST bus fares this Diwali due to drought