कुंभमेळ्याची कामे वेळेत पूर्ण होणार : पालकमंत्री गिरीश महाजन
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी सव्वा लाख ते दीड लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज असून, यावेळी गर्दीचे सर्व विक्रम मोडले जातील, असा विश्वास पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 31 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजून 2 मिनिटांनी नाशिकच्या रामकुंडावर आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर ध्वजारोहण होणार आहे. सोहळ्याच्या तयारीसाठी रात्रंदिवस काम सुरू असून, आवश्यक सोयीसुविधा वेळेत पूर्ण केल्या जातील, असे त्यांनी
सांगितले.
नाशिक येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, तर त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि साधू-महंतही सोहळ्याला उपस्थित राहतील. तांत्रिक अडचणी आणि ढगाळ वातावरणामुळे राष्ट्रपतींचा दौरा वाहनाने होणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्यासाठी धरणातून स्वतंत्रपणे पाणी सोडले जाणार नाही. मागणीनुसारच पाण्याचा विसर्ग केला जाईल. पुढील वर्षी जूनमध्ये पावसाला विलंब झाल्यास पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी नागरिकांनी आतापासून 10 ते 15 टक्के पाणी बचत करावी, असे आवाहन त्यांनी केले. साधुग्राममधील वृक्षतोडीबाबत न्यायालयाच्या परवानगीनंतरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.
शाळा बंद ठेवण्याचा निर्णय ऐच्छिक
ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने गर्दी व्यवस्थापनासाठी शाळा बंद ठेवणे योग्य ठरू शकते. मात्र, शाळा बंद ठेवणे बंधनकारक नाही. परिस्थितीचा विचार करून संबंधित शाळा प्रशासनाने याबाबत निर्णय घ्यावा, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
गोदावरी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून काम सुरू आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन असून, नदीत प्रदूषित पाणी जाणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गोदावरी वर्षभर प्रवाहित ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे महाजन यांनी सांगितले.
All records for crowd size will be broken at the flag-hoisting ceremony.