नाशिक : प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने भेसळयुक्त पदार्थाची विक्री करणार्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. निफाड तालुक्यात 39 लाख 18 हजार 520 रुपये किमतीचा एकूण 6,457 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष मोहीम राबवत भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणार्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील आर्या कोल्ड स्टोअरेज अॅण्ड एक्स्पोर्टवर कारवाई केली. तपासणीदरम्यान 39 लाख 18 हजार 520 रुपयांचा एकूण 6,457 किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. यात 2,996 किलो फ्रोजन कस्टर्ड पल पल्प, 1,780 किलो आंबा पल्प आणि 1,681 किलो क्रीमचा समावेश आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढेे यांच्या मार्गदर्शनाखाली 9 सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. संबंधित अन्नपदार्थ मिथ्याछाप तसेच कमी दर्जाचे असल्याच्या संशयावरून त्यांचा साठा ताब्यात घेण्यात आला. तपासणीवेळी अन्नपदार्थांच्या लेबलवर वापरण्याची अंतिम तारीख, पोषणमूल्याची माहिती, पॅकिंगची तारीख आणि भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाचा परवाना क्रमांक नमूद नसल्याचे आढळले.
जप्त केलेल्या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्नपदार्थांचा दर्जा निश्चित होऊन त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सुहास मंडलिक आणि अमित रासकर यांनी सहायक आयुक्त अन्न दिनेश तांबोळी आणि सहआयुक्त अन्न मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
Food stock worth ₹39 lakh seized in Niphad