नाशिक : प्रतिनिधी
हरितालिका आणि गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला रविवारी नाशिक शहर व उपनगरांतील बाजारपेठा पूजासाहित्य, पत्री, फळे आणि फुलांच्या खरेदीसाठी गजबजल्या होत्या. जिल्ह्याला पावसाचा इशारा असतानाही दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाची तमा न बाळगता रेनकोट, छत्रीचा आधार घेत तसेच प्रसंगी भिजत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली.
हरितालिका पूजन सकाळी, तर गणेशपूजनासाठी सकाळी दहानंतर मुहूर्त असल्याने महिला आणि पुरुषांची सणाच्या तयारीसाठी मोठी लगबग दिसून आली.
हरितालिका आणि गणेशोत्सव सलग आल्याने शहरातील प्रमुख बाजारपेठांसह उपनगरांमध्ये हंगामी विक्रेत्यांनी फळे, फुले, पत्री आणि पूजासाहित्याचे स्टॉल थाटले होते. त्यामुळे अनेक बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप आले होते. पूजा पत्रीचे पुडे, हळकुंड, पंचखाद्य, कापूर, कापूस, अगरबत्ती आदी पूजासाहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. नारळ सुमारे 40 रुपये, पाच फळांचा संच 50 ते 80 रुपये, विड्याची पाने 10 रुपयांना 11, तर फुलांचे वाटे 20 ते 30 रुपयांना विकले जात होते. तयार फुलांच्या माळांना 30 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत दर होता.
हरितालिकेसाठी रताळी 50 ते 80 रुपये किलो, सफरचंद 150 ते 200 रुपये किलो, पेरू 70 ते 100 रुपये किलो, केळी 30 ते 40 रुपये डझन, तर ड्रॅगन फ्रूट दोन किलोसाठी सुमारे 100 रुपये दराने उपलब्ध होते. गणेशपूजेसाठी केळी, सफरचंद, पेरू, संत्री आणि चिकू अशा पाच फळांचा संचही विक्रीस ठेवण्यात आला होता.
गणपतीच्या पूजेसाठी आवश्यक 21 प्रकारच्या भाज्यांनाही मागणी होती. या भाज्या सुमारे 30 रुपये पावशेर दराने विकल्या जात होत्या. त्याचबरोबर पेढा, खवा, सुकामेवा तसेच तळणीच्या विविध प्रकारच्या मोदकांची दुकानेही सजली होती. गणेशोत्सवासाठी मोदक खरेदी करण्यासाठीही नागरिकांची गर्दी
दिसून आली.
पाऊस सुरू असतानाही बाजारपेठांमधील गर्दीवर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. मंगलमय वातावरणात गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी घराघरांत तयारी पूर्ण झाली असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
हरितालिका पूजनासाठी महिलांची लगबग
हरितालिका पूजनाचा मुहूर्त सकाळी असल्याने महिलावर्गाची तयारी पूर्वसंध्येपासूनच सुरू होती. पूजेसाठी वाळूची पिंड तयार करण्यापासून अन्य साहित्याची जमवाजमव आणि पूजेची तयारी करण्यात महिलांचा उत्साह दिसून आला. हरितालिका पूजनानंतर महिला दिवसभर उपवास करतात. पूजनाचे छायाचित्रण आणि चित्रफिती करण्यासाठीही महिला-पुरुषांमध्ये
उत्साह होता.
Even in heavy rain, there is a rush to buy worship materials.