शासकीय कामात अडथळा; नगरपंचायत कर्मचार्यांचे धरणे आंदोलन
निफाड : तालुका प्रतिनिधी
निफाड शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करताना कुत्र्यांना प्लास्टिकच्या गोणीत टाकून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या टेबलावर सोडणे, तसेच पैशांचा हार टेबलावर ठेवून आरडाओरड व दमदाटी केल्याप्रकरणी शिवसेना युवासेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम नामदेव रंधवे यांच्यासह पाच जणांविरुद्ध निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मुख्याधिकारी धीरज भामरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात विक्रम नामदेव रंधवे, रूपाली विक्रम रंधवे, बिरजू पठाण, सुनील पाठक आणि रतन गाजरे यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. निफाड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखण्यासाठी विक्रम रंधवे यांनी नगरपंचायतीकडे मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर संबंधितांनी नगरपंचायत कार्यालयात जाऊन मुख्याधिकार्यांच्या टेबलावर कुत्रे सोडल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ नगरपंचायत कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून एकदिवसीय धरणे आंदोलन केले. तसेच निफाड पोलिस ठाण्यात निवेदन देऊन घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनल पडोळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
आंदोलनात रामदास कराटे, किरण माळी, मनोज ढकोलिया, प्रकाश पवार, जालिंदर पवार, जयसिंग ठाकरे, आर. सी. भवर, शरद काकुळते, नरेश धारराव, सुनील मोरे, सुनील गांगुर्डे, अनिल कुंदे, नितीन तांबे, शरद बोडके, दिनेश सोनवणे, रतन खालकर, मुकुंद शिंदे, योगेश कांदळकर, नीलेश ठाकूर, गौरव मोरे, मनोज कुंभार, विनोद चिंतामणी, विपुल सेंद्रे, राहुल लामखेडे, सिद्धार्थ जगताप, सुनील माळी, मयुरी नवले आदी कर्मचारी उपस्थित होते.
Case registered against five people, including Vikram Randhave.