घरफोडीतील चोरी गेलेला सोन्याचा नेकलेस पोलिसांकडून हस्तगत

गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष प्रयत्न

नगरसूल : प्रतिनिधी
येवला तालुक्यातील खरवंडी-ममदापूर येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात चोरीस गेलेला 57 हजार रुपये किमतीचा 17 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस येवला तालुका पोलिसांनी हस्तगत केला. मात्र, तपासादरम्यान हा ऐवज परिसरातच मिळून आल्याने फिर्यादीचा चोरीबाबतचा संशय दूर झाला असून, सध्या कोणाविरुद्धही तक्रार नसल्याचे त्यांनी
पोलिसांना सांगितले.
नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या सूचनेनुसार येवला तालुका पोलिसांनी गुन्हे शोध पथक नव्याने कार्यान्वित करून मागील काही महिन्यांतील चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
खरवंडी येथील रहिवासी व सध्या ममदापूर येथे राहणारे भाऊसाहेब कान्हू सौंदाणे (46, व्यवसाय-शेती) यांच्या घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. कपाटातील 17 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, किंमत 57 हजार रुपये चोरीस गेल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्यावरून येवला तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दौलत के. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांच्या मदतीने घटनास्थळासह परिसरात शोध घेतला. यावेळी चोरीस गेलेला सोन्याचा नेकलेस मिळून आला. तो फिर्यादीचाच असल्याची खात्री झाल्यानंतर 57 हजार रुपये किमतीचा ऐवज सुपूर्दनाम्यावर त्यांच्याकडे देण्यात आला.
ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार माळोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Gold necklace stolen in a house burglary recovered by the police.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *