मध्यरात्री बेपत्ता झालेली बालिका सुखरूप सापडली

पोलिसांच्या अथक शोधमोहिमेला यश

नांदगाव : प्रतिनिधी
नांदगाव तालुक्यातील मन्याड चौकी (बाभूळवाडी) परिसरातून आई-वडिलांच्या शेजारी झोपलेली अवघ्या आठ महिन्यांची बालिका मध्यरात्री अचानक बेपत्ता झाल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, नांदगाव पोलिसांच्या अथक शोधमोहिमेला अखेर यश आले असून, ही बालिका येवला तालुक्यातील वाईबोथी येथे रस्त्याच्या कडेला सुखरूप आढळून आली आहे.
17 सप्टेंबरच्या रात्री मोरे कुटुंबीय नेहमीप्रमाणे जेवण करून घरात झोपले होते. मध्यरात्री बालिकेची आई जागी झाली असता, शेजारी झोपलेली आठ महिन्यांची तनू दिसून आली नाही. परिसरात शोधाशोधकरूनही ठावठिकाणा न लागल्याने तात्काळ नांदगाव पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. वाड्या-वस्त्यांवर शोधमोहीम राबवत श्वानपथक व तज्ज्ञांची मदत घेण्यात आली. तपासादरम्यान बालिका येवला तालुक्यातील वाईबोथी येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिला ताब्यात घेतले. शासकीय रुग्णालयात प्राथमिक तपासणी केल्यानंतर बालिका सुखरूप असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून येवला व नांदगाव पोलिसांनी चिमुकलीला तिच्या आई-वडिलांच्या सुखरूप स्वाधीन केले. आपल्या लाडक्या मुलीला पुन्हा पाहत कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान परिसरात घडलेल्या एका आत्महत्येच्या घटनेचाही पोलीस तपास करत असून, दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

Girl who went missing at midnight found safe.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *