सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नियोजन; साडेचौदा कोटींचा खर्च
नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरात होणारी गर्दी लक्षात घेता, मनपा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तपोवनात शंभर खाटांचे, नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयात पन्नास व पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात चाळीस, अशी एकूण 190 खाटांची क्षमता तीन रुग्णालयांत वाढवली जाणार आहे. यासाठी एकूण साडेचौदा कोटींचा खर्च केला जाणार आहे.
शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यात तीन अमृतस्नानांदरम्यान आठ ते दहा कोटी भाविक येण्याची शक्यता आहे. शहरात होणारी गर्दी ऐन पावसाळ्याच्या दिवसांत होणार आहे. पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढत असल्याने अशावेळी आरोग्याची कुठलीही समस्या उद्भवू नये याकरिता महापालिकेने आपल्या रुग्णालयांचे अधिक सक्षमीकरणासाठी खाटांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तपोवन रुग्णालयाचे काम सुरू असून, तेथे शंभर खाटांचे स्वतंत्र रुग्णालय होत असल्याने भाविकांसाठी ते अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी पाच कोटींचा खर्च केला जात आहे. आयसीयू व शस्त्रक्रिया कक्ष, साहित्य-उपकरणाकरिता दोन कोटी, असा एकूण सात कोटींचा खर्च एकट्या तपोवनातील रुग्णालयावर केला जात आहे.
पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयाची देखभाल-दुरुस्ती गुरुवारपासून सुरू करण्यात आली आहे. सध्या साठ खाटांची व्यवस्था असून, त्यात आणखी 40 खाटा वाढवून ही संख्या शंभर करण्यात आली आहे.
बिटको रुग्णालयात जळीत कक्ष
बिटको रुग्णालयातील खाटांची संख्या अडीचशे होणार असून, सध्या तेथे जळीत कक्षाची व्यवस्था नसल्याने रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठवावे लागते. पण, ‘बिटको’तही दहा खाटांच्या जळीत कक्षाची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे पीडित रुग्णांची सोय होण्यास मदत होईल. याकरिता एक कोटी 68 लाखांचा खर्च केला जाणार आहे.
Bed capacity at the municipal corporation hospital to increase by 190.