पगाराची 15 लाखांची रोकड घेऊन सुपरवायझर फरार

माळेगाव एमआयडीसीत प्रकार; कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल

सिन्नर : प्रतिनिधी
कामगारांच्या पगारासाठी मालकाने विश्वासाने सोपवलेली 15 लाख रुपयांची रोकड घेऊन सुपरवायझरच पसार झाल्याचा प्रकार माळेगाव एमआयडीसीत समोर आला आहे. पाच वर्षांपासून कामावर असलेल्या सुपरवायझरने कामगारांना पगार न देता रोकड घेऊन पलायन केल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप कोंडाजी सांगळे हे माळेगाव एमआयडीसी परिसरात लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतात. त्यांच्याकडे अमित कुमार साहू (रा. पिपरिया, जि. होशंगाबाद, मध्य प्रदेश) हा गेल्या पाच वर्षांपासून सुपरवायझर म्हणून कार्यरत होता. या काळात त्याने सांगळे यांचा विश्वास संपादन केला होता.
16 ते 17 सप्टेंबरदरम्यान सांगळे यांनी कामगारांना पगार देण्यासाठी साहू याच्याकडे 15 लाख रुपयांची रोकड दिली.
मात्र, साहूने कामगारांना पगार वाटप केले नाही. त्याऐवजी संपूर्ण रोकड घेऊन तो पसार झाला. 15 लाखांच्या रकमेत 500, 200, 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या नोटांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी एमआयडीसी सिन्नर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 396(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, पुढील तपास सुरू आहे.
पाच वर्षांपासून कामावर असलेल्या सुपरवायझरकडे मोठी रोकड सोपविण्यात आली होती. मात्र, कामगारांचा पगार करण्याऐवजी त्याने रोकड घेऊन पलायन केल्याने फर्ममधील कर्मचार्‍यांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.

Supervisor absconds with ₹15 lakh in cash meant for salaries.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *