प्रभाग सभापतींच्या अचानक पाहणीत धक्कादायक वास्तव उघड
नाशिक : प्रतिनिधी
नागरिकांना त्यांच्या घराजवळच प्राथमिक आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी उभारण्यात आलेल्या आयुष्मान आरोग्य मंदिरांचीच आरोग्यव्यवस्था आजारी पडल्याचे चित्र सातपूरमध्ये समोर आले आहे. सातपूर प्रभागातील चार आरोग्यवर्धिनी केंद्रांपैकी दोन ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने परिचारिका आणि मदतनिसांच्या भरवशावर आरोग्यवर्धिनीचा कारभार सुरू असल्याचे वास्तव दिसले. सातपूर प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या अचानक पाहणी दौर्यात ही बाब उघड झाली.
नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शहरात शंभराहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिर अर्थात, आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, मदतनीस आणि सफाई कर्मचारी असा आवश्यक मनुष्यबळाचा आराखडा निश्चित केला आहे. मात्र, प्रत्यक्षात डॉक्टरच उपलब्ध नसतील तर या केंद्रांचा उपयोग काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सातपूर परिसरातील समृद्धनगर, सावरकरनगर, विश्वासनगर आणि प्रबुद्धनगर येथे चार आरोग्यवर्धिनी केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे रुग्णांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी प्रभाग सभापती देवरे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यांची दखल घेत देवरे यांनी मंगळवारी (दि. 29) दुपारी अचानक पाहणी केली. यावेळी आरोग्यवर्धिनी केंद्रांचे प्रत्यक्ष कामकाज पाहून आरोग्य विभागाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
समृद्धनगर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजश्री भोसले ऑगस्टपासून प्रसूती रजेवर असून, त्या फेब्रुवारीत रुजू होणार असल्याची माहिती पाहणीत समोर आली. त्यामुळे या केंद्राचा कारभार सध्या नियमित वैद्यकीय अधिकार्याविना सुरू आहे. सावरकरनगर आरोग्यवर्धिनीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत मोरे आठवड्यातील दोन दिवस आनंदवल्ली येथील आरोग्यवर्धिनी केंद्रात सेवा देत आहेत. आनंदवल्ली येथील डॉ. अश्विनी जाधव प्रसूती रजेवर असल्याने डॉ. मोरे यांच्याकडे तेथील अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे सावरकरनगर येथील आरोग्यसेवेवरही त्याचा परिणाम होत असल्याचे पाहणीत निदर्शनास आले. दरम्यान, विश्वासनगर येथील वैद्यकीय अधिकारी डिसेंबरमध्ये प्रसूती रजेवर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात या केंद्राची वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनासमोर आणखी एक आव्हान उभे राहणार आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना दुसर्या आरोग्य केंद्रात जावे लागणे, वारंवार हेलपाटे मारावे लागणे आणि त्यातून वेळ व पैसा खर्च होणे, अशी परिस्थिती निर्माण होत असल्याच्या तक्रारी सभापतींकडे आल्या आहेत.
डॉक्टरच नसतील तर आरोग्यवर्धिनी केंद्र कशासाठी?
आरोग्यवर्धिनी केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना प्राथमिक उपचार, तपासणी आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसताना परिचारिका आणि मदतनिसांच्या भरवशावर केंद्र सुरू ठेवण्याची वेळ आली असेल, तर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या मनुष्यबळ नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः ग्रामीण आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी जवळच्या आरोग्य केंद्राचा मोठा आधार असतो. त्यामुळे डॉक्टरांच्या अनुपस्थितीचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता आहे.
अचानक केलेल्या या पाहणी दौर्यात आरोग्यवर्धिनी केंद्रांचे भीषण वास्तव समोर आले आहे. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे काही केंद्रांचा कारभार परिचारिका व मदतनिसांच्या भरवशावर सुरू असल्याचे दिसले. आरोग्याशी संबंधित सेवा अशा पद्धतीने चालणे योग्य नाही. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेऊन रिक्त पदांवर तातडीने वैद्यकीय अधिकार्यांची नियुक्ती करण्याची मागणी करणार आहोत.
– समाधान देवरे, सातपूर प्रभाग सभापती
’Arogyavardhini’ itself on ventilator support!