आरपीएफच्या दंडात्मक कारवाईमुळेे प्रवासी वैतागले

लासलगाव रेल्वे स्थानकाबाबत खासदार भगरेंकडे तक्रार

लासलगाव : वार्ताहर
लासलगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा तिकीट काढण्यासाठी येणार्‍या नागरिकांच्या दुचाकींना आरपीएफ कर्मचार्‍यांकडून वायर रोप लावून थेट पाचशे रुपयांपर्यंत दंड आकारला जात आहे. या मनमानी कारभारामुळे प्रवासीवर्ग मोठ्या प्रमाणावर वैतागला आहे. ही दंडात्मक कारवाई तत्काळ थांबवावी, अशी संतप्त मागणी प्रवाशांकडून होत आहे.
लासलगाव स्थानकावर दररोज दहापेक्षा जास्त गाड्या थांबतात आणि हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून स्टेशन परिसरात दुचाकी व चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविषयी तीव्र नाराजी आहे. अनेकांनी मोर्चा एसटी व खासगी बससेवेकडे वळवला आहे. या त्रासाला कंटाळून त्रस्त प्रवाशांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांच्याकडे धाव घेतली असून, त्यांनी यात लक्ष घालून आरपीएफ अधिकार्‍यांच्या मनमानीविरोधात वरिष्ठांकडे पत्रव्यवहार व कारवाईचे आश्वासन दिले आहे.

अमृत भारत योजनेचा विरोधाभास

अमृत भारत स्टेशन योजनेतून स्थानकाचा विकास केला जात असताना, दुसरीकडे आरपीएफच्या अशा कारवाईमुळे प्रवासी रेल्वे सुविधांपासून दूर पळत आहेत.

नाशिकचे तिकीट 50 अन् दंड 500 रुपये

लासलगाववरून नाशिकला जाण्यासाठी रेल्वेचे तिकीट केवळ 50 रुपये आहे; परंतु प्रवाशाला सोडायला आल्यास 500 रुपयांचा दंड आकारला जात असल्याने प्रवाशांनी रेल्वेबद्दल नापसंती व्यक्त केली.

मजुरी 300 रुपये अन् दंड 500 रुपये

गोरगरीब व मोलमजुरी करणार्‍या नागरिकांना दिवसभर कष्टाने 300 रुपये मिळतात, तर स्टेशनवर आल्यास 500 रुपयांची पावती फाडली जात असल्याने हे पैसे कसे भरायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

माझी पत्नी आजारपणामुळे मुंबईहून येत होती. तिला आणण्यासाठी गेलो असता, माझी गाडी दोन तास वायर रोप लावून अडकवून ठेवली. ज्येष्ठ नागरिक असल्याचे सांगूनही नाहक त्रास दिला गेला.

– अशोक नागरे, प्रवासी

 

तपोवन एक्स्प्रेसने जाणार्‍या मुलीला सोडायला स्टेशनवर गेलो होतो. मुलगी गाडीत बसवून येईपर्यंत गाडीला 500 रुपयांचा ऑनलाइन दंड आकारण्यात आला. हा प्रकार अतिशय चुकीचा आहे. – नारायण कदम, प्रवासी

 

Commuters frustrated by RPF’s punitive action.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *