लासलगाव बाजार समितीत कांदा दरात घसरण

शेतकर्‍यांत चिंता; कर्नाटक-आंध्र प्रदेशातील आवकेचा वाढता प्रभाव

लासलगाव : समीर पठाण
कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून नवीन खरीप कांद्याची आवक वाढल्यामुळे राज्यातील कांदा बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आशियातील प्रसिद्ध असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या प्रतीच्या कांद्याचा घाऊक दर गेल्या महिन्यातील 55 रुपयांवरून थेट 46 रुपयांपर्यंत खाली आला आहे. मात्र, घाऊक बाजारात दर घसरले असतानाही किरकोळ बाजारात ग्राहकांना अद्याप 65 रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करावा लागत आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोन्ही घटकांसमोर आव्हाने कायम आहेत.
लासलगाव बाजारात सोमवारी (दि. 5) कांद्याला किमान 1200, कमाल 4612, तर सरासरी 4100 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. सध्या बाजारात दररोज सुमारे सहा ते सात हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे.
कर्नाटक व आंध्र प्रदेशात खरीप कांद्याची आवक वाढल्याने आणि इजिप्तमधून झालेल्या कांदा आयातीमुळे पुरवठा वाढला आहे. त्यामुळे व्यापार्‍यांचा ओढा नव्या कांद्याकडे असून, नाशिकच्या कांद्याच्या मागणीवर परिणाम झाला आहे. बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम यांच्या मते, हॉटेल उद्योगाकडून नाशिकच्या कांद्याला अजूनही चांगली मागणी असल्याने दरात मोठी घसरण होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, निर्यातदार विकास सिंह यांनी परदेशातून नव्या कांद्याला पसंती मिळत असल्याचे सांगितले.

शेतकर्‍यांची धाकधूक वाढली

दर आणखी घसरण्याच्या भीतीने शेतकरी साठवून ठेवलेला जुना कांदा बाजारात आणण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काळात आवक वाढून घाऊक दरांवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो.

किरकोळ बाजारात कांदा महागच

घाऊक बाजारात दर 50 रुपयांच्या आत आले असले, तरी किरकोळ बाजारात कांदा 65 रुपयांपर्यंत विकला जात आहे. 20 ते 30 टक्के कांदा खराब होत असल्याने विक्रेते हा तोटा भरून काढत असल्यामुळे ग्राहकांना थेट फायदा मिळत नाही.

दिवाळीपर्यंत चढ-उतार राहणार

हवामानाचा पिकांवर झालेला परिणाम, निर्यात आणि देशांतर्गत मागणी यावर भविष्यातील दर अवलंबून असतील. दिवाळीपर्यंत बाजारात अनिश्चितता कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

Decline in onion prices at Lasalgaon Market Committee.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *