– अनिल उदावंंत
कुणाला शांत स्वभावाची तर कुणाला चंचल माणसं आवडतात. कुणाला नेहमी बिनधास्त असलेली तर कुणाला सतत काळजी वाहणारी माणसं आकर्षित करतात. कुणाला हुशार माणसं आवडतात, तर कुणाला विनोदबुद्धी असलेली माणसं आवडतात. आपण यावर कधी विचार केलाय का? हा केवळ योगायोग असतो, की आपल्या मनाने काही ओळखीची माणसं आवडती म्हणून निवडलेली असतात? अनेकदा चेहरे बदलतात, नावं बदलतात, गावं बदलतात, नाती बदलतात, माती बदलते. तरीही आपल्याला आवडणार्या माणसांचा प्रकार मात्र बदलत नाही. असं का होत असावं? आपल्यापैकी प्रत्येकाला विशिष्ट प्रकारची माणसं आवडत असतात. कारण आपल्या आवडीमागे काही जैविक, मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आधार परस्परांशी जोडलेले असतात. आपली ही आवड केवळ आपल्या स्वभावाशी संबंधित बाब नसते. ती आपले अनुभव, मूल्ये, गरजा आणि सुरक्षिततेची भावना यांचा एकत्रित परिणाम असते.
सारखेपणा वा साधर्म्याचा प्रभाव, परिचयातून येणारी जवळीक, भावनिक सुरक्षितता, स्वप्रतिमेचे प्रतिबिंब आणि पूर्वानुभव असे काही मानसिक आधार या बाबतीत महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्यासारखे विचार, मूल्ये, भाषा, आवड किंवा जीवनानुभव असणारे लोक आपल्याला अधिक परिचित आणि समजून घेण्यास सोपे वाटतात. ज्या व्यक्तींना आपण वारंवार भेटतो, त्यांच्याशी आपलेपणा निर्माण होण्याची शक्यता वाढते. वारंवार संपर्कामुळे सुरुवातीला वाटणारा अनोळखीपणा कमी होत जातो आणि ओळख वाढत जाते. मात्र, केवळ ओळख पुरेशी नसते. एखाद्या व्यक्तीसमोर आपण स्वतःसारखे राहू शकतो का, हा प्रश्नही महत्त्वाचा असतो. आपलं म्हणणं ऐकून घेणारी, आपल्यावर विश्वास ठेवणारी, दयाळू आणि आपल्या वर्तनात सातत्य राखणारी माणसं आपल्याला अधिक सुरक्षित वाटतात. त्यांच्या सहवासात आपल्याला आपली मतं व्यक्त करण्याची, चुका करण्याची आणि तरीही स्वीकारले जाण्याची मोकळीक मिळते. म्हणून त्यांच्याशी आपली जवळीक निर्माण होते. अनेकदा आपल्याला एखादी व्यक्ती तिच्या एखाद्या गुणामुळे आवडते; पण त्या गुणामागे आपल्या मनाची एखादी गरज दडलेली असू शकते. काही व्यक्तींमध्ये आपल्याला स्वतःचे गुण, आकांक्षा किंवा अपूर्ण इच्छा दिसतात. आपल्यात नसलेला पण आपल्याला हवा असलेला एखादा गुण दुसर्या व्यक्तीत दिसला, तरी त्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते. म्हणजेच, कधी कधी आपल्याला समोरची व्यक्ती जितकी आवडते, तितकंच त्या व्यक्तीत दिसणारं आपलं स्वतःचं प्रतिबिंबही आपल्याला आवडत असतं. आपले बालपणीचे अनुभव, पालकांशी असलेली भावनिक जवळीक, पूर्वीची मैत्री आणि इतर नात्यांमधले बरे-वाईट अनुभव यांमुळे आपल्याला कोणत्या प्रकारची व्यक्ती भावते याचे काही नमुने आपल्या अंतर्मनात तयार होतात. आपण कोणत्या समाजात वाढतो, कोणत्या वर्गात किंवा समूहात राहतो, कोणती भाषा बोलतो आणि कोणत्या लोकांशी नियमित संबंध ठेवतो, यानुसार आपल्या आवडी-निवडीची चौकट तयार होते. सामाजिक जीवनात समान पार्श्वभूमीची माणसं अधिक जवळची वाटू शकतात. आपल्या सामाजिक वर्तनावर नियम, रूढी, मूल्ये आणि परंपरांचा प्रभाव असतो. काही समाजांत नम्रता, संयम आणि मितभाषीपणा हे महत्त्वाचे गुण मानले जातात; तर काही ठिकाणी बोलकेपणा, आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा आणि नेतृत्वगुण यांना अधिक महत्त्व दिले जाते. या सामाजिक अपेक्षांचाही आपल्या आवडी-निवडीवर प्रभाव पडतो.
आपले कुटुंब, आपल्या जातीय किंवा धार्मिक परंपरा, प्रादेशिक भाषा, लोकसाहित्य, माध्यमे आणि शिक्षण यांमधून आपण व्यक्तींचे मूल्यमापन करण्याचे काही निकष शिकतो. मराठी संस्कृतीच्या संदर्भात साधेपणा, आपुलकी, कर्तव्यभावना, विनोदबुद्धी किंवा संवेदनशीलता या गुणांना विशेष महत्त्व मिळू शकते. आपल्याला एखादा गुण खरोखर आवडतोय की तो गुण आपल्याला आवडावा अशी सामाजिक प्रतिमा आपल्या मनावर बिंबवली गेली आहे, हा प्रश्नही कधी कधी विचारायला हवा. म्हणूनच आपल्याला एखादी व्यक्ती आवडली की स्वतःला काही प्रश्न विचारणे उपयोगी ठरते. जसं की, मला या व्यक्तीमध्ये नेमके कोणते गुण आवडतात? या व्यक्तीचा हा गुण माझ्या मूल्यांशी खरोखर जुळतो का? या व्यक्तीसमोर मला सुरक्षित, स्वतंत्र आणि आदरयुक्त वाटते का? या व्यक्तीसोबत मी स्वतःसारखा राहू शकतो का? मला ही व्यक्ती खरंच आवडतेय, की तिच्याबद्दलची माझी एक कल्पना मला आवडतेय? आणि सर्वांत महत्त्वाचा प्रश्न- मला ही व्यक्ती आवडते म्हणून मी तिच्याशी नातं जोडावं का? की तिच्यासोबतचं नातं माझ्यासाठी योग्य आहे का, हेही तपासायला हवं? विशिष्ट प्रकारची माणसं आवडणे ही निसर्ग, अनुभव, अवचेतन मन, समाज आणि संस्कृती यांच्या परस्परसंवादातून तयार होणारी प्रक्रिया आहे. आपली आवड आपली असते; पण त्या आवडीची मुळे नेहमीच केवळ आपल्यात असतात असं नाही. त्यात आपले अनुभव असतात, आपली स्वप्रतिमा असते, सुरक्षिततेची गरज असते आणि समाजाने आपल्याला शिकवलेले काही
निकषही असतात.
Why do we like specific people?