व्यसनांना नकार, राष्ट्रनिर्मितीला होकार!

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

नाशिक : प्रतिनिधी
भारताच्या विकासासाठी तरुणांची ऊर्जा योग्य दिशेने वापरणे आवश्यक असून, अमली पदार्थ हे तरुणांच्या एकाग्रतेसह चारित्र्य आणि आरोग्यापुढील मोठे आव्हान आहे. त्यामुळे तरुणांनी अमली पदार्थांपासून दूर राहून मैदानी खेळ, चांगल्या सवयी आणि ध्येयनिष्ठेच्या माध्यमातून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे. मित्र, नातेवाईक आणि समाजालाही व्यसनमुक्तीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
मराठा विद्या प्रसारक समाज आणि एसजेजे अ‍ॅनालिटिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने सशक्त युवा, सशक्त भारत अभियानांतर्गत बुधवारी (दि. 28) महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित नो ड्रग्ज उपक्रमात ते बोलत होते. या उपक्रमात विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनाची सामूहिक शपथ देण्यात आली. कार्यक्रमाला जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन, न्या. मदन गोसावी, न्या. दिलीप घुमरे, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, एसजेजे अ‍ॅनालिटिकल लॅबॉरेटरीचे संचालक अ‍ॅड. महेश सावंत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल वर्मा म्हणाले, की भारतातील सुमारे 65 टक्के लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे. ही तरुण शक्ती देशाची मोठी संपत्ती असून, 2047 पर्यंत विकसित भारत घडविण्यात तिची महत्त्वाची भूमिका असेल. मात्र, अमली पदार्थांचे व्यसन हे तरुणांच्या प्रगतीतील मोठे आव्हान आहे. शिक्षण म्हणजे केवळ पदव्या मिळवणे नव्हे, तर चारित्र्य घडवणे होय. चांगल्या सवयींमधून उत्तम चारित्र्य निर्माण होते आणि त्यातूनच उज्ज्वल भविष्य घडते. तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांची ध्येयनिष्ठा, एकाग्रता आणि संघर्ष करण्याची वृत्ती आत्मसात करावी. समाजात अमली पदार्थांचा वापर होत असल्याचे आढळल्यास तक्रार करावी आणि व्यसनाधीन व्यक्तींना त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मराठा विद्या प्रसारक समाजच्या विविध शाखांमधील तब्बल एक लाख 28 हजार 759 विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ घेत एक नवा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी राज्यातून प्रथम मविप्र संस्थेची निवड करण्यात आली आहे. आज या उपक्रमाचा शुभारंभ मविप्र संस्थेतून झाला, असे अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी सांगत कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. अ‍ॅड. महेश सावंत यांनी प्रास्ताविक केले. माजी आमदार जयवंत जाधव यांनी आभार मानले.

व्यसनमुक्त पिढी हाच महासत्तेचा पाया : महाजन
भारताला सन 2047 पर्यंत महासत्ता बनवायचे असेल, तर पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच सुदृढ आणि व्यसनमुक्त पिढी घडवणे आवश्यक आहे, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. अगदी 12 ते 14 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्यांपर्यंत अमली पदार्थांचे व्यसन पोहोचल्याच्या बातम्या चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.
आई-वडील स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांच्या शिक्षणासाठी कष्ट करतात. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून तरुणांनी वाईट संगत आणि मित्रांच्या दबावाला बळी पडू नये. गुटखा, तंबाखू, सिगारेट, मद्य आणि अमली पदार्थांपासून दूर राहावे. ताणतणावावर मात करण्यासाठी वाचन, अध्ययन, खेळ आणि व्यायामाची मदत घ्यावी. स्वतः व्यसनमुक्त राहून मित्रांनाही त्यापासून दूर राहण्यास प्रवृत्त करावे, असे आवाहन केले.

यांचा झाला सन्मान
याप्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते स्तुत्य उपक्रम आयोजित केल्याबद्दल मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे, एसजेजे अ‍ॅनालिटिकल लॅबोरेटरीचे संचालक अ‍ॅड. महेश सावंत यांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. जयंत जायभावे, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, एशियन गेम्समध्ये दोन सुवर्णपदक मिळविणारा खेळाडू दिलीप गावित व प्रशिक्षक वैजनाथ काळे, एशियन गेम्समध्ये रौप्यपदक मिळविणारा सर्वेश कुशारे व प्रशिक्षक रावसाहेब जाधव, माजी आमदार निशिगंधा मोगल व राजाभाऊ मोगल, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हिरालाल पवार, मिलिंद जोशी, युवा उद्योजक शिवम यादव यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

दीडशे शाखांमध्ये लाइव्ह प्रसारण
दि. 23 ते 28 ऑक्टोबर 2026 या कालावधीत अवघ्या पाच दिवसांत एकूण 1,28,759 जणांनी नोंदणी पूर्ण केली. या नोंदणीत 1,22,291 विद्यार्थी, 4,422 शिक्षक, 1,114 पालक आणि 932 शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा समावेश आहे. या सर्वांनी राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्येक शाखेवर, विविध सभागृहांत, शाळा-महाविद्यालयांच्या मैदानांवर लाइव्ह कार्यक्रमात सहभागी होत अमली पदार्थांपासून दूर राहण्याची शपथ घेतली. विशेष म्हणजे, मविप्र संस्थेच्या सुमारे 150 शाखांत या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण करण्यात आले.

व्यसनमुक्तीचा संदेश तळागाळापर्यंत : अ‍ॅड. सावंत
पंतप्रधानांच्या क्रीडा आणि निरोगी भारताच्या संकल्पनेनुसार तरुणांनी खेळांना आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवले पाहिजे. तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी आम्ही आयुष्यभर कटिबद्ध राहू आणि व्यसनमुक्तीचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही अ‍ॅड. सावंत यांनी दिली.

अमली पदार्थांपासून दूर राहा : अ‍ॅड. नितीन ठाकरे
नाशिकमध्ये व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण चिंताजनक असून, मुलांबरोबरच मुलीही व्यसनांच्या विळख्यात अडकत आहेत. व्यसनाला ठामपणे नाही म्हणणे महत्त्वाचे आहे. पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून व्यसनांचे दुष्परिणाम समजावून सांगावेत. केवळ शैक्षणिक यशापेक्षा सुसंस्कृत, व्यसनमुक्त आणि सक्षम नागरिक घडणे अधिक महत्त्वाचे असल्याचे अ‍ॅड. ठाकरे यांनी सांगितले.

Say no to addictions, say yes to nation-building!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *