सिन्नर : प्रतिनिधी
दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होत आहे. शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालकांसह पादचार्यांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात ही समस्या अधिक गंभीर होत असल्याने वाहतूक पोलिस आणि नगरपालिकेने नियोजनबद्ध उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
दिवाळीच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत ग्रामीण भागातूनही मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. कपडे, किराणा, मिठाई, फटाके, सजावटीचे साहित्य तसेच पूजेच्या साहित्याच्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. त्यातच बाजारपेठेतील अरुंद रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीचा वेग मंदावतो. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, पादचार्यांना रस्त्यावरून मार्ग काढणेही कठीण होत आहे.
शहरातील नेहरू चौक, नवा पूल, गणेश पेठ, नाशिक वेस, खासदार पूल, भैरवनाथ मंदिर परिसर, जुनी नगरपालिका कॉर्नर आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवत आहे. या भागांमध्ये दुकाने, व्यावसायिक आस्थापना आणि नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहनांची गर्दी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.
वाहतूक पोलिसांनी गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करून वाहतुकीचे नियंत्रण करावे. दुचाकींची अनियंत्रित पार्किंग रोखण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी. त्याचबरोबर व्यापारीवर्गानेही दुकानांसमोर वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.
दिवाळी हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण असला तरी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा वेळ आणि संयम दोन्ही खर्ची पडत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपालिका आणि वाहतूक पोलिस प्रशासनाने तातडीने समन्वय साधून ठोस उपाययोजना कराव्यात. सणासुदीच्या काळात बाजारपेठेतील गर्दी लक्षात घेता चारचाकी वाहनांना प्रमुख बाजारपेठेत प्रवेशबंदी करून वाहतुकीचे योग्य नियोजन करावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सणासुदीच्या काळात वाहतुकीचे स्वतंत्र नियोजन हवे!
दिवाळीच्या कालावधीत तसेच त्यानंतरचे पाच ते सहा दिवस बाजारपेठेतील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेडिंग करून वाहतुकीचे नियमन करणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करून पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिल्यास वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकते. तसेच शहराबाहेरील किंवा बाजारपेठेपासून काही अंतरावरील मोकळ्या जागांमध्ये चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
Large crowds of citizens in the market area of Sinnar city for shopping