सटाण्यात तोतया एफडीआय अधिकार्‍यांचा पर्दाफाश

मिठाई दुकानात तपासणीच्या नावाखाली दिशाभूल करणारे तिघे जेरबंद

सटाणा : प्रतिनिधी
शासकीय अधिकारी असल्याची बतावणी करून येथे व्यापार्‍यांची दिशाभूल करणार्‍या आणि मिठाई दुकानांची तपासणी करण्याचा बनाव रचणार्‍या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून दुकानदारांवर दबाव आणणार्‍या या तिघांची न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
सटाणा शहरातील नाशिक नाका परिसरातील राजस स्वीट्स या दुकानात हा प्रकार घडला. कारमधून आलेल्या तीन अनोळखी व्यक्तींंनी दुकानात प्रवेश करून आपण नाशिक येथील अन्न सुरक्षा विभागातून आल्याचे सांगितले. तसेच परवाने मागून दुकानातील स्वच्छतेबाबत त्रुटी काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दुकानदाराचा त्यावर विश्वास बसला. मात्र, त्यांच्या संशयास्पद हालचालींमुळे दुकानदार रोहित सोनवणे यांनी त्यांच्याकडे अधिकृत ओळखपत्राची मागणी केली. ओळखपत्र मागताच त्यांची भंबेरी उडाली आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
दुकानदाराने नाशिकच्या अन्न सुरक्षा विभागाशी संपर्क साधून खातरजमा केली असता, असा कोणतेही पथक पाठविण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ते तोतया अधिकारी असल्याचे उघड झाले. संशयितांनी कारने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, दुकानदाराने दुचाकीवरून पाठलाग करत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांना पकडले.
विश्वास शिवाजी उफाडे (वय 43, रा. अंबड, नाशिक), भगवान कचरू आहिरे (वय 35, रा. सिडको, नाशिक) आणि स्वप्नील रमेश बागूल (वय 35, रा. पाथर्डी फाटा, नाशिक) अशी या बनावट अधिकार्‍यांची नावे आहेत. दुकानदार रोहित सोनवणे यांच्या फिर्यादीवरून सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Fake FDI officials exposed in Satana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *