सटाणे कर्‍ही गावात एकाच रात्री 5 ठिकाणी सशस्त्र दरोडे

मनमाड : प्रतिनिधी
मनमाड परिसरासह ग्रामीण भागात दरोडे व चोर्‍यांचे सत्र वाढले आहे. गुरुवारी मध्यरात्री तालुक्यातील सटाणे कर्‍ही गावात सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. मध्यरात्री 12 ते 2 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी गावातील पाच ठिकाणी धाडसी दरोडे टाकत महिलांच्या अंगावरील दागिने लुटले. यावेळी प्रतिकार करणार्‍या ग्रामस्थांना हॉकी स्टिक, चॉपर, तलवार व लोखंडी रॉडने बेदम मारहाण करण्यात आली, त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
दरोडेखोरांच्या या हल्ल्यात रक्ताळलेल्या गंभीर जखमींना सुरुवातीला मनमाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव व लोणी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
एकाच रात्री पाच घरांना लक्ष्य करत रोख रक्कम व दागिन्यांचा ऐवज ओरबडण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ गावात धाव घेतली. शुक्रवारी (दि.6) सकाळी श्वानपथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात येऊन ठसे व महत्त्वाचे पुरावे जमा करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित व पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची पथके दरोडेखोरांचा शोध घेत आहेत.

गस्त वाढविण्याची मागणी

मनमाड शहर व परिसरात घरफोड्या आणि वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तीन दिवसांपूर्वीच शहरात मोठी घरफोडी झाली होती. वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांनी रात्रीच्या वेळी ग्रामीण व शहरी भागात गस्त तातडीने वाढवावी, अशी आग्रही मागणी नागरिकांमधून होत आहे.

 

Armed robberies at 5 locations in a single night in Karhi village, Satana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *