देण्या-घेण्याच्या चक्रातलं आयुष्य आणि उमेद

– अनिल उदावंंत

आपलं आयुष्य आनंदरंगात रंगून जावं, ही प्रत्येक माणसाची स्वाभाविक इच्छा असते. त्यासाठी तो आपल्या वकुबानुसार कष्टत असतो. आपले कष्ट कमी व्हावेत, आपल्या कष्टाला अनुकूल फळं मिळावीत यासाठी माणूस देवाकडे किंवा भोवतालच्या माणसांकडे सतत काहीतरी मागत असतो. देवाकडे काही मागावं लागत नाही. तो सर्वज्ञ असतो. तो स्वतःहून देत असतो, असं कुणी कितीही सांगितलं असलं तरी माणसाला नेमकं जे हवंय ते दरवेळी मिळत नाही. आपल्याला जे हवंय ते देवाकडून नेमकेपणानं मिळवता यावं, हा प्रार्थनेमागचा एक हेतू असावा. माणसांसाठी मात्र अशी प्रार्थना अद्याप अस्तित्वात आलेली नाही.
संपूर्ण आयुष्यात माणूस आपल्या सोबतच्या माणसांकडे प्रेम, आदर, सन्मान, वेळ, सल्ला, मदत आणि सहकार्य मागत राहतो. इतरांनी त्याला समजून घ्यावं, त्याची कदर करावी, कौतुक करावं, असं त्याला वाटत असतं. पण अपेक्षा करताना ज्याच्याकडे जे आहे, तेच तो देऊ शकतो, ही साधी गोष्ट तो विसरतो. ज्याच्याकडे वेळ नाही, तो वेळ देऊ शकत नाही. ज्याच्या मनात प्रेम नाही, तो प्रेम देऊ शकत नाही. ज्यानं स्वतःचंच दुःख समजून घेतलेलं नाही, त्याला दुसर्‍याचं दुःख समजून घेणं कठीण जातं. अर्थात, काही देण्याची क्षमता असणं आणि ते देण्याची इच्छा असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
बरेचदा माणसं आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी देतातही. पण त्यांचं देणं कधी स्वतःच्या आवडीतून आलेलं असतं, तर कधी परिस्थितीमुळे. कुणी प्रेम देतं, तर कुणी दूर निघून जातं. कुणी वेळ देतं, तर कुणी स्वतःच्याच संघर्षात आकंठ बुडालेलं असतं. अनेकदा आपल्याला कुणी दिलेलं आणि आपल्याला हवं असलेलं यात फरक असतो. तेव्हा ’मी इतकं दिलं, तरी त्याने मला काय दिलं?’ असा हिशेब आपण मांडतो. खरं तर, अशा हिशेबातून आपण स्वतःलाच वेदना देत असतो.
मानवी आयुष्यातील नाती ही काहीशी कर्जासारखी असतात. आपण कुणाकडून घेतलेलं प्रेम, मदत, आधार आणि वेळ यांची परतफेड त्याच व्यक्तीला, त्याच स्वरूपात करावी असं नाही. कधी त्या माणसाच्या संकटात त्याला हात देऊन, तर कधी दुसर्‍या कुणाला सहानुभूती आणि आधार देऊनही ती परतफेड करता येते. निसर्गाचं हे गणित असं आहे की, आपल्याला मिळालेलं चांगुलपण अनेकदा नव्या स्वरूपात पुढे कुणाला तरी देता येतं.
कधीकधी आपल्याला वाटतं की, काहीच न घेता आपण फक्त देत आहोत. अशावेळी आपण ’व्याज’ देत असतो! आपल्या नात्यांची किंमत, आपली ऊर्जा, आपला वेळ आणि मानसिक शांतता खर्च करीत असतो. कुणाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला दुखावून घेणं, कुणाच्या रागात आपला बळी देणं, कुणाच्या दुर्लक्षाला स्वतःची उणीव मानणं, हे आपण मोजत असलेलं व्याज असतं. हे व्याज दीर्घकाळ किंवा जास्त प्रमाणात द्यावं लागलं, तर आपली उमेद कमी होत जाते.
नात्यांमधील एखादी गोष्ट कधी गिफ्ट, तर कधी रिटर्न गिफ्ट असते. जेव्हा आपण एखाद्याला अनपेक्षितपणे, कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता प्रेम देतो, तेव्हा ते गिफ्ट असतं. ते दिल्यावर आपल्याला आनंद होतो. त्याच्या बदल्यात काही मिळेल, अशी अट नसते. पण आपण काही देतो आणि बदल्यात आपल्याला काही मिळतं, तेव्हा ते रिटर्न गिफ्ट असतं. गिफ्ट मनाचा मोठेपणा दाखवतं, तर परस्परांच्या भावनांची दखल घेणारं रिटर्न गिफ्ट नात्याला जिवंत ठेवतं. अर्थात, गिफ्ट देताना रिटर्न गिफ्टची अपेक्षा ठेवली तर देण्यातील निखळपणा कमी होतो.
अपेक्षा आणि वास्तव यांच्यातील अंतर जितकं जास्त, तितका अपेक्षाभंग आणि निराशेचा संभव अधिक. निराशा वाढत गेली की जगण्याची उमेदही कमी होऊ शकते. मात्र, अपेक्षा कमी करण्याच्या नावाखाली अन्याय किंवा सततची उपेक्षा सहन करणंही योग्य नाही. नात्यात दुसर्‍याला समजून घेण्याइतकाच स्वतःचा आत्मसन्मान जपणंही महत्त्वाचं आहे.
आपली उमेद टिकवण्यासाठी दोन गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आपल्याकडे जे आहे तेच आपण देऊ शकतो आणि दुसर्‍याकडे जे आहे तेच तो आपल्याला देऊ शकतो. या दोन्ही गोष्टी समजल्या की आपण दुसर्‍याच्या आणि
स्वतःच्याही मर्यादा ओळखू लागतो. त्यामुळे प्रत्येक अपेक्षाभंगाला दोष देण्याऐवजी परिस्थिती समजून घेऊन स्वीकारणं सोपं होतं.
बहुतेक वेळा आपण बाहेरच्या नात्यांकडे बघण्यात इतके गुंततो की स्वतःकडे बघायचं विसरून जातो. आपण स्वतःला किती आणि काय देतो? आपल्या थकलेल्या मनाला विश्रांती देतो का? आपल्या चुकांना क्षमा करतो का? आपल्या इच्छांना पुरेसा अवकाश देतो का? जर नाही, तर जगाला खूप काही देताना आपल्या आतल्या उमेदीचं पाणी संपून जातं.
स्वतःला काही देणं म्हणजे स्वार्थ नाही. स्वतःला वेळ देणं, प्रेम देणं, क्षमा करणं, स्वतःशी प्रामाणिक राहणं आणि स्वतःच्या मर्यादा स्वीकारणं म्हणजे आपल्यातील उमेद जपणं. आपल्या आतला उमेदीचा तलाव भरलेला असेल, तरच आपण इतरांना मनापासून काही देऊ शकतो. अन्यथा आपलं देणं हे स्वतःच्या रिकामपणाची किंमत मोजण्यासारखं ठरेल. एकंदरीत आयुष्य हे देण्या-घेण्याचं चक्र आहे. कधी आपण देतो, कधी घेतो. कधी कर्ज देतो, कधी घेतो. कधी व्याज भरतो, तर कधी त्यातून समृद्ध होतो. कधी गिफ्ट देतो, तर कधी प्रेमाने दिलेलं गिफ्ट स्वीकारतो. या सगळ्यात आपली उमेद टिकवण्याचं सूत्र एकच आहे. अपेक्षा ठेवा, पण त्या वास्तवाशी सुसंगत असू द्या. इतरांना देताना आपल्या क्षमतेचा विचार करा. कुणाकडून काही मिळालं तर कृतज्ञ राहा. नात्यातील परस्परतेची जाणीव ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कधीच विसरू नका.

Life and hope in the cycle of give and take

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *