सिन्नर-नाशिक एसटी भाड्याचा घोळ

सिन्नर : प्रतिनिधी

सिन्नर-नाशिक एसटी प्रवासात भाडे आकारणीचा गोंधळ पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकाच दिवशी एकाच मार्गावर धावणार्‍या साध्या एसटी बसमधून प्रवास करताना प्रवाशांकडून वेगवेगळे भाडे आकारले जात असल्याचे तीन तिकिटांवरून समोर आले आहे. 14 नोव्हेंबरच्या या तिकिटांवर 70 तर 16 नोव्हेंबरच्या तिकिटावर 60 आणि 85 रुपये भाडे नमूद असून, नेमका अधिकृत दर कोणता, असा संभ्रम प्रवाशांमध्ये निर्माण झाला आहे.
प्रवाशांनी उपलब्ध करून दिलेल्या तिकिटांनुसार, नारायणगाव आगाराच्या बसमध्ये सिन्नर ते नाशिक सीबीएस प्रवासासाठी 85 रुपये, मुरुड आगाराच्या बसमध्ये नाशिक सीबीएस ते सिन्नर प्रवासासाठी 60 रुपये, तर शेवगाव आगाराच्या बसमध्ये सिन्नर ते नाशिक जुने बसस्थानक प्रवासासाठी 70 रुपये आकारण्यात आले आहेत. तिन्ही बस साध्या प्रकारच्या असून, वेगवेगळ्या आगारांतून या बस चालवण्यात आल्या होत्या. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या निकालानुसार सिन्नर-नाशिक प्रवासाचे भाडे 70 रुपये असावे, असा दावा प्रवाशांकडून केला जात आहे. असे असतानाही काही वाहकांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारले जात असल्याचा आरोप आहे. या प्रकाराबाबत एसटी महामंडळ आणि सिन्नर आगाराच्या व्यवस्थापकांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची नाराजी प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचा दावा करत, न्यायालयाच्या आदेशानुसार भाडे आकारणी न करणार्‍या संबंधित वाहक आणि जबाबदार अधिकार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच आतापर्यंत प्रवाशांकडून आकारण्यात आलेल्या जादा भाड्याबाबत एसटी महामंडळाने स्पष्टीकरण द्यावे, अशीही मागणी होत आहे.

अधिकृत भाडे दरपत्रक जाहीर करण्याची मागणी

एकाच मार्गावर वेगवेगळ्या आगारांच्या बसमधून प्रवास करताना भाड्यात तफावत का असते, याचा खुलासा एसटी प्रशासनाने करावा. नारायणगाव, मुरुड आणि शेवगाव आगारांच्या तिकिटांची तपासणी करून सिन्नर-नाशिक मार्गाचे अधिकृत भाडे दरपत्रक प्रवाशांसाठी उपलब्ध करून द्यावे. तसेच वाढीव भाडे आकारणीची चौकशी करून प्रवाशांकडून घेतलेल्या अतिरिक्त रकमेबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Discrepancies in Sinnar-Nashik ST bus fares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *