सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याचे वृत्त; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची कारवाई; पक्षशिस्तभंगाचा ठपका
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा फटका अखेर शहराध्यक्ष सुनील केदार यांना बसल्याचे वृत्त आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाला विश्वासात न घेता स्वीकृत नगरसेवकांची नावे परस्पर निश्चित केल्याचा ठपका ठेवत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केदार यांच्याकडून शहराध्यक्षपदाचा राजीनामा घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या कारवाईला पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नसल्याने राजीनाम्याबाबत संभ्रम कायम आहे.
महापालिकेच्या शुक्रवारी (दि. 20) झालेल्या महासभेत दहा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. त्यात भाजपच्या सहा, तर शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या प्रत्येकी दोन सदस्यांचा समावेश आहे. भाजपकडून अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांना संधी देण्यात आली. मात्र, या निवडीवरून पक्षातील नाराजी उफाळून आली.
भाजपच्या सहा जागांसाठी तब्बल तीनशेहून अधिक इच्छुक होते. अंतिम यादीत अनपेक्षित नावे आल्याने संधी हुकलेल्या काही इच्छुकांनी थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रारी केल्या. स्वीकृत नगरसेवकपदासाठी सुचविलेल्या नावांची अधिकृत यादी प्रदेश नेतृत्वापर्यंत पोहोचविण्यात आली नसल्याचाही आरोप झाला.
या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केदार यांना मुंबईत बोलावून पक्षशिस्तीचे पालन न केल्याबद्दल जाब विचारल्याचे आणि त्यांचा राजीनामा घेतल्याचे वृत्त आहे.
महापालिका निवडणुकीपासूनच भाजपमधील अंतर्गत मतभेद
चर्चेत आहेत. निवडणुकीवेळी एबी फॉर्मच्या वाटपावरून झालेला गोंधळ, इच्छुकांकडून केदार यांच्या वाहनाचा पाठलाग आणि त्यानंतर स्वीकृत नगरसेवकांच्या सातव्या जागेसाठी झालेल्या राजकीय हालचालींमुळे पक्षातील नाराजी वाढली होती. काँग्रेसच्या मदतीने अतिरिक्त जागा मिळविण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला. त्यातच स्वीकृतच्या अंतिम यादीवरून नव्या वादाला तोंड फुटले. दरम्यान, राजीनाम्याच्या वृत्ताबाबत केदार यांनी वरिष्ठ पातळीवरून प्रतिक्रिया न देण्याच्या सूचना असल्याचे सांगितले.
पक्षात फेरबदलाचे संकेत
भारतीय जनता पक्षाच्या नाशिक शहराध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असले, तरी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा किंवा पत्र समोर आलेले नाही. मात्र, स्वीकृत सदस्य निवडीवरून निर्माण झालेल्या मतभेदानंतर पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांनी नुकतीच नाशिकमध्ये कोअर कमिटीची बैठक घेऊन आढावा घेतला आहे. पक्षातील अंतर्गत सूत्रांनुसार, येत्या काही दिवसांत नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती करून हा बदल केला जाऊ शकतो. या पदासाठी अनिल भालेराव आणि सुनील देसाई यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे.
BJP city president loses his position amidst the ‘nominated member’ controversy!