ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरला धडक; ट्रकला लागली आग
चांदवड (वार्ताहर) :
मुंबई-आग्रा महामार्गावरील राहुड घाट रविवारी (दि. 22) अपघातांच्या घटनांनी हादरला. घाटात ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने पुढे जाणार्या कंटेनरला जोरदार धडक दिल्याने तिघे जण जखमी झाले. याचदरम्यान राहुड गावाजवळ आणखी एका ट्रकला आग लागल्याने महामार्गावरील वाहतूकदारांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
नाशिकहून मालेगावच्या दिशेने जाणार्या ट्रकचे (एमएच 20 ईएल 9710) राहुड घाटातील मारुती मंदिराजवळ अचानक ब्रेक निकामी झाले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने पुढे जात असलेल्या कंटेनरला (एमएच 04 एलई 8312) पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात तिघे जखमी झाले असून, त्यात मोहम्मद अन्सारी (रा. धुळे) आणि राजा बांबू प्रेमसिंग (रा. उत्तर प्रदेश) यांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज यांच्या मोफत रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, राहुड गावाजवळ दुसर्या एका ट्रकला (एमपी 09 एचएच 5792) अचानक आग लागली. आगीचे कारण समजू शकले नसून, यामुळे महामार्गावर काही काळ गोंधळ उडाला होता. राहुड घाटातील अवघड वळणे व वारंवार होणार्या अपघातांमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस निरीक्षक अभिजीत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस दोन्ही घटनांचा पुढील तपास करीत आहेत.
Three injured in collision between two trucks in Rahud Ghat