बाराशे क्रेट्स पेरूंसह 13 लाखांचा ट्रक गायब

चालकावर गुन्हा दाखल; पिंपळगाव बसवंत पोलिसांत तक्रार

निफाड : तालुका प्रतिनिधी
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीसह परिसरातून सिलिगुडी येथे विक्रीसाठी पाठवण्यात आलेल्या 13 लाख रुपये किमतीच्या पेरूच्या मालासह ट्रकच गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. माल निर्धारित ठिकाणी न पोहोचवता अपहार केल्याप्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील न्यू स्टार पोर्टचे व्यावसायिक शादाब मेहताब आलम (वय 26, रा. सरिता विहार, दक्षिण दिल्ली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यांचे मित्र मयूर सुनील गांगुर्डे (रा. दिंडोरी) हे फळे खरेदी करून ट्रकमध्ये भरून देतात. 6 ऑक्टोबर 2026 रोजी पेरू भरण्याची तयारी झाल्यावर आलम यांनी ब्लॅकबग अ‍ॅपद्वारे सिलिगुडी येथील सह्याद्री फर्मसाठी ट्रकची नोंदणी केली.
राजन तिवारी (रा. गाजीपूर, सध्या नाशिक) याने संपर्क साधून व्हॉट्सअ‍ॅपवर ट्रकची कागदपत्रे (यूपी 83 सीटी 9681), परवाना व ओळखपत्र पाठवले. 1 लाख 5 हजार रुपये भाडे ठरून 48 तासांत माल पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले. 7 ऑक्टोबर रोजी पळसे येथून 400 क्रेट्स (किंमत 4 लाख 33 हजार 333 रुपये) व पिंपळगाव बाजार समितीतून 800 क्रेट्स (किंमत 8 लाख 66 हजार 666 रुपये), असे एकूण 1200 क्रेट्स (अंदाजे 12 हजार किलो) 13 लाखांचे पेरू भरून ट्रक रवाना झाला. त्याच दिवशी रात्री समृद्धी महामार्गावरून डिझेलसाठी 15 हजार रुपये मागितल्याने आलम यांनी ऑनलाइन रक्कम पाठवली. 8 ऑक्टोबरपासून तिवारीचे दोन्ही मोबाइल बंद झाल्याने संशय आला. 9 ऑक्टोबरला ट्रक मालक राजवीर सिंह (रा. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित ट्रक आपला नसल्याचे स्पष्ट केले.
याप्रकरणी शादाब आलम यांच्या फिर्यादीवरून राजन तिवारीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316 (3) अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलिस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई रवींद्र गुंजाळ तपास करत आहेत.

Truck carrying 1,200 crates of guavas—worth 13 lakhs—goes missing

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *