आपल्या बाळाच्या पालनपोषणात, शिक्षणात, आवडीनिवडी जपण्यात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी आई-वडील आयुष्यभर राबत असतात. मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून हवा तेवढा पैसा उभा करण्याची त्यांची तयारी असते. त्यासाठी प्रसंगी कर्ज काढतात, इतरांच्या हाता-पाया पडतात, अपमान सहन करतात. स्वतःच्या स्वप्नांना आणि इच्छांना मारून मुलांच्या आवडीनिवडी पूर्ण करतात. मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्या नावाने पॉलिसी, म्युच्युअल फंड आणि बँकेत ठेवीही साठवतात. आपल्या ठेवींनाही मुलांनाच नॉमिनी ठेवतात. पिढीजात आणि स्वतः आयुष्यभरात कमावलेल्या स्थावर जंगम संपत्तीलाही मुलांनाच वारस नेमतात.
या सर्वांच्या बदल्यात लेकरांनी आपल्या उतारवयात आपला चांगला सांभाळ करावा ही एकमेव अपेक्षा त्यांची असते. हल्ली मात्र वृद्ध माता-पित्यांच्या पदरी बर्याचदा उपेक्षाच पडते. म्हातारपणात मुले नीट सांभाळत नाहीत, सुना अपमानास्पद वागणूक देतात, घालून पाडून बोलतात, अशी अनेकांची तकार असते. काही महाभागांना तर जन्मदात्यांचे पण ओझे होते. ते त्यांना वृद्धाश्रमात सोडतात. ज्या लेकरांना त्यांच्या लहानपणी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले, त्या लेकरांकडून होणारा छळ सहन करताना त्या मातापित्यांचे काळीज किती तुटत असेल. यांतील काहीजण बिचारे नशिबाचे भोग समजून सर्व निमूटपणे सहन करतात. काही मात्र मुलांनाच धडा चांगलाच शिकवतात. अशाच एका वृद्ध पित्याने आपल्या मुलाला कायदेशीर मार्गाने चांगलाच धडा शिकवला.
एका 85 वर्षीय वृद्ध पित्याने ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांचा निर्वाह अन् कल्याण कायदा, 2007’अंतर्गत जिल्हाधिकार्यांकडे तक्रार प्रविष्ट करून मोठ्या मुलाला आणि सुनेला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली. मात्र, जिल्हाधिकार्यांनी हे आरोप सिद्ध झाले नसल्याचे सांगत तक्रार निकाली काढली. दोन मुलांमधील व्यावसायिक वाद सोडवण्यासाठी वृद्ध कायद्याचा गैरवापर करत असल्याचे जिल्हाधिकार्यांचे म्हणणे होते. या निर्णयाला आव्हान देणार्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्यांच्या भूमकेवरच प्रश्न उपस्थित केले. मुलांमधील व्यावसायिक वादामुळे वृद्धाने केलेल्या आरोपांच्या सत्यतेविषयी शंका घेता येणार नाही किंवा ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत त्यांना संरक्षण नाकारता येणार नाही.
ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध स्वतःचे घर मुलांसमवेत वाटून घेण्याची सक्ती करता येणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान केला. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांना
स्वतःच्या घरात शांततेने आणि सन्मानाने राहण्याचा अधिकार आहे, असेही न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले. न्यायालयाने म्हटले की, ज्येष्ठ नागरिकांचा घरातील छळ अनेकदा चार भिंतींच्या आत होत असल्याने त्याविषयी स्वतंत्र पुरावे मिळवणे कठीण असते. त्यामुळे घरातून मुलांना बाहेर काढण्याचा आदेश देण्यापूर्वी छळाचे आरोप ठोस आणि निर्विवाद पुराव्यांनी सिद्ध करण्याची कायद्यात अट नाही. 2008 मध्ये मुलाचे लग्न झाल्यानंतर वडिलांनी मोठ्या मुलाला आणि सुनेला राहण्यासाठी पर्यायी जागा बघून घर सोडण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी घर सोडण्यास नकार दिला आणि तेव्हापासून ते आई-वडिलांशी गैरवर्तन करू लागले. 2020 मध्ये वृद्धाच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर हा छळ अधिकच वाढला. या प्रकरणात आता देहली उच्च न्यायालयाने 85 वर्षीय वृद्धाचा मुलगा आणि सून यांना त्यांचे घर चार आठवड्यांत रिकामे करण्याचा आदेश दिला. ‘आदेशाची कार्यवाही करण्यासाठी आवश्यकता पडल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रमुख अधिकार्याने वृद्धाला आवश्यक ते सर्व सहाय्य करावे. वृद्ध व्यक्तीला स्वतःच्या घरात शांततेने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे’, ही बाब न्यायालयाने विशेषतः नोंदवली.
मुलांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आई-वडील बर्याचदा आपले सर्वस्व मुलांच्या नावे करतात. हीच मुले या आई-वडिलांच्या म्हातारपणात त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करताना जराही विचार करत नाहीत. त्यामुळे कोणीही आपली सर्व संपत्ती मुलाबाळांच्या नावे करण्याची घाई करू नये. आपल्या म्हातारपणात आपल्या उदरनिर्वाहाला आणि औषधपाण्याला कामी येईल इतकी आर्थिक तरतूद आधीच करून ठेवावी, असा सल्ला हल्ली गुंतवणूक सल्लागारही देऊ लागले आहेत. सध्याचा बदलता काळ पाहता ते योग्यही आहे.
गरज पडल्यास आपल्या कृतघ्न मुलांना धडा शिकवण्याची तयारी असावी हेच वरील उदाहरणातून लक्षात येते. आई-वडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून साक्षात भगवंतालाही 28 युगे विटेवर उभे राहण्यास लावणार्या पुंडलिकाची ही भारतभूमी आहे. अंध आई-वडिलांना कावडीत बसवून काशी यात्रा घडवू पाहणार्या श्रावण बाळाची ही सात्त्विक भूमी आहे. आईच्या एका वचनाखातर अवतारी कार्यात 14 वर्षे वनवास भोगणार्या प्रभू श्रीरामांची ही पवित्र भूमी आहे. अशा या पावनभूमीत काही नतद्रष्ट पुत्र जन्माला येत असतील तर त्यांना जन्माची अद्दल घडवण्याची सिद्धता आई-वडिलांनी करायला हवी.
Ungrateful children must be taught a lesson!