अरुंद मोरीत आयशर ट्रक पलटी

सिडको : प्रतिनिधी
सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिर चौफुली परिसरात पशुपतिनाथ मंदिराजवळ शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी सहाच्या सुमारास आयशर ट्रक शिवरोडवरील नाल्यात कोसळून उलटला. या अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला असून, सुदैवाने जीवितहानी टळली. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर ट्रक (एमएच 15 डीके 3480) सातपूर-अंबड लिंकरोडवरून दत्तमंदिर चौकातून पशुपतिनाथ मंदिराजवळून केवल पार्कच्या दिशेने जात होता. वळण घेताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट शिवरोडच्या नाल्यात कोसळून उलटला. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
घटनेची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 26 चे नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. इंगोले आणि त्यांचे सहकारी अमोल हिवाळे यांनी नाल्यात अडकलेल्या जखमी चालकाला बाहेर काढून तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने सातपूर-अंबड लिंकरोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

सातपूर-अंबड लिंकरोडवरील दत्तमंदिर चौफुलीकडून सिडकोकडे जाणार्‍या शिवरोडवर वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, पशुपतिनाथ मंदिराजवळील नाल्याची मोरी अरुंद असल्याने येथे अपघाताचा धोका कायम आहे. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी या मोरीवर पूल बांधण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यासाठी पाठपुरावा करू.
– निवृत्ती इंगोले, नगरसेवक

Eicher truck overturns in a narrow drain

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *