बारा कोटींची क्लीन चिट

– गोरख काळे

बारा कोटींचा हिशेब मागताना सभागृह डोक्यावर घेणारे स्थायी समितीचे सदस्य अचानक शांत कसे झाले? प्रशासनाच्या आकडेवारीवर अविश्वास दाखवून चौकशीची मागणी करणार्‍यांनी पुढच्याच बैठकीत अनपेक्षित यू-टर्न का घेतला? नाशिक महापालिकेच्या समाजकल्याण विभागातील महिला प्रशिक्षणाच्या खर्चावरून निर्माण झालेले हे प्रश्न आता चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेष म्हणजे, चौकशीसाठी समिती नेमल्यानंतरही तिच्या कामकाजाची साधी विचारणा न करता विभागाला मिळालेली कथित क्लीन चिट अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे.

महिलांना स्वावलंबी करून त्यांनी स्वतःचा व्यवसाय करावा, याकरिता महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून सोळा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. दरम्यान, प्रशासकीय राजवटीत या प्रशिक्षणावर बारा कोटी खर्च केल्याच्या दाव्यावर गेल्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी हरकत घेतली होती. आमच्या प्रभागात कुठे प्रशिक्षण घेण्यात आले, याचा जाब विचारत 12 कोटींचा लेखाजोखा मागण्यासाठी सर्वच सदस्यांनी सभागृह डोक्यावर घेतले होते. अखेर सभापती मच्छिंद्र सानप यांनी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली. मात्र, गुरुवारी (दि. 19) झालेल्या बैठकीत या चौकशीचा ठोस तपशील समोर न येताच सदस्यांचा आक्रमक सूर मवाळ झाल्याचे दिसले. गेल्या स्थायी समिती सभेत सदस्य किरण गामणे, भारती ताजनपुरे, रंजना बोराडे, राहुल दिवे, अदिती पांडे, दीपाली कुलकर्णी आदींसह सर्वच सदस्यांनी कौशल्य विकास योजनेच्या कारभारावर संशय व्यक्त केला होता. प्रशिक्षणावर किती खर्च झाला यासाठी सदस्य अडून बसले असता, तीन तासांनी सभागृहात आकडेवारी सादर करण्यात आली होती. त्यावेळी समाजकल्याणचे प्रमुख नितीन नेर यांनी सादर केलेल्या आकडेवारीवर विश्वास नसल्याची भूमिका सदस्यांनी घेतली. आमच्या प्रभागात महिला स्वयंरोजगारासाठी कुठे व कधी प्रशिक्षण घेतले, याचा जाब विचारला. त्यामुळे पुढील बैठकीत चौकशीचा अहवाल मागितला जाईल, अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र गुरुवारी वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सदस्यांनी प्रशिक्षणाची माहिती मागितली असता, या कामाचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट झाल्याचे नेर यांनी सांगितले. त्यावर सदस्य राहुल दिवे यांनी ऑडिटच्या प्रती सर्व सदस्यांना द्या जेणेकरून त्यांचे समाधान होईल, अशी भूमिका मांडली. यानंतर दिवेंसह कोणीही सदस्यांनी या बारा कोटींच्या कामाचा हिशेबच मागितला नाही. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने काय केले, याबाबत साधी विचारणाही होऊ शकली नाही. मग चौकशी समिती नेमण्याचा उद्देश तरी काय होता? मुळात ऑडिट झाले म्हणजे सर्वकाही आलबेल आहे, असे समजण्याचे कारण नाही.
खर्चाची कागदपत्रे तपासणे आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाची खातरजमा करणे या दोन वेगळ्या बाबी आहेत. सहा ते सात हजार महिलांना प्रशिक्षण दिल्याचा दावा आहे. त्यात कितपत वस्तुस्थिती व सत्यता आहे, याची पडताळणी होणे आवश्यक आहे. प्रशिक्षण नेमके कुठे झाले, किती महिलांनी ते पूर्ण केले आणि त्यांपैकी किती जणींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला, हेही स्पष्ट व्हायला हवे. 12 कोटींचा खर्च खरोखरच महिलांच्या स्वावलंबनासाठी फलदायी ठरला का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागरिकांच्या करातून महापालिका विकासकामांकरिता खर्च करत असते. होणारा खर्च पारदर्शकपणे होतो की नाही, याकरिता प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम लोकप्रतिनिधींचे आहे. समाजकल्याणच्या कारभाराची चौकशी होईल, अशी शक्यता असताना त्याच्या खोलात न जाता दाखविलेला सॉफ्ट कॉर्नर कोणासाठी, हे खटकणारे आहे. स्थायी सदस्यांनी अचानक सोडलेल्या भूमिकेमुळे चांगलीच चर्चा होत आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. मात्र, चौकशीचे निष्कर्षही समोर आलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने ऑडिटचा अहवाल आणि चौकशी समितीची कार्यवाही सार्वजनिक करणे आवश्यक आहे. अन्यथा 12 कोटींच्या खर्चाभोवती निर्माण झालेले संशयाचे धुके कायम राहणार आहे. कारण प्रश्न केवळ बारा कोटींच्या हिशेबाचा नाही, तर तो हिशेब मागणारे अचानक गप्प का झाले, याचाही आहे.

A clean chit worth 120 million

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *