कारवाईचा धडाका, मग इतकी वर्षे दुर्लक्ष का?

– अश्विनी पांडे

शहरातील हॉटेल्समध्ये अस्वच्छता, भेसळयुक्त व दर्जाहीन अन्नपदार्थांची विक्री, तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारवाईमुळे हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. मात्र, नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. आज ज्या त्रुटींच्या आधारे हॉटेलचे परवाने निलंबित केले जात आहेत, त्या यापूर्वीही अस्तित्वात होत्या. मग इतकी वर्षे त्याकडे दुर्लक्ष का झाले? आधीच्या अधिकार्‍यांनी कारवाई का केली नाही? त्यांच्या कार्यकाळातील निष्क्रियतेची जबाबदारी निश्चित होणार का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

अन्न व औषध प्रशासनाकडून गेल्या काही महिन्यांपासून भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री, अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यावसायिकांविरोधात कारवाई केली जात आहे. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मावा, पेढे आणि मिठाईच्या नमुन्यांची तपासणी करून कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता प्रशासनाने शहरातील हॉटेले आणि खाद्य आस्थापनांकडे मोर्चा वळविला आहे. शहरातील प्रसिद्ध हॉटेल सायंतारा, श्यामसुंदर मिसळ, तुषार मिसळ, विहार मिसळ, महाराजा काठियावाडी आणि दुर्गा कॅफे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काही आस्थापनांचे परवाने, तर काहींची नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत. या तपासण्यांमध्ये स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कच्च्या मालाची अयोग्य साठवणूक, मुदतबाह्य अन्नपदार्थ, कीटकांचा प्रादुर्भाव, उंदरांची विष्ठा अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत. ग्राहकांना दिल्या जाणार्‍या बिलांवर अन्नसुरक्षा परवाना क्रमांक नसणे, स्वयंपाकासाठी वापरण्यात येणार्‍या माध्यमाची माहिती प्रदर्शित न करणे, अशा त्रुटीही आढळल्या आहेत. या बाबी पाहता नागरिकांना आतापर्यंत नेमक्या कोणत्या परिस्थितीत अन्नपदार्थ दिले जात होते, असा प्रश्न निर्माण होतो. विशेष म्हणजे, ही हॉटेले एका दिवसात उभी राहिलेली नाहीत. वर्षानुवर्षे त्यांचा व्यवसाय सुरू असताना या त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या नव्हत्या का, हा कळीचा मुद्दा आहे.
’एफडीए’च्या कारवाईमुळे आता अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलच्या स्वच्छतेकडे आणि नूतनीकरणाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. काही हॉटेले नूतनीकरणासाठी बंद ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या कारवाईची धास्ती निर्माण झाल्याने व्यावसायिकांमध्ये नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण होत असेल, तर ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. मात्र, ही सुधारणा केवळ कारवाईच्या भीतीपोटी न होता ग्राहकांच्या आरोग्याची जबाबदारी म्हणून झाली पाहिजे. दुसरीकडे, अन्न व औषध प्रशासनाकडे अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे व्यापक तपासणी आणि मोठ्या प्रमाणावर कारवाई करणे शक्य होत नसल्याची चर्चा यापूर्वी होत होती. मात्र, उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे आता सातत्याने कारवाई केली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आधीच्या काळात मनुष्यबळाची कमतरता हेच कारण होते की, कारवाईसाठी आवश्यक इच्छाशक्तीचा अभाव होता, याचेही आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे. अर्थात, आधीच्या अधिकार्‍यांनी कारवाई केलीच नाही, असा निष्कर्ष काढण्याऐवजी त्यांच्या कार्यकाळातील तपासण्या, नोटिसा आणि कारवायांचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. नियमभंगाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असल्यास त्याची जबाबदारीही निश्चित झाली पाहिजे.
शहरात मोठ्या हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई होत असताना रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या स्वच्छतेचाही प्रश्न महत्त्वाचा आहे. फुटपाथ, रस्त्यांच्या कडेला आणि गर्दीच्या ठिकाणी विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी होते का, त्यांच्याकडे स्वच्छ पाणी आणि सुरक्षित साठवणुकीची व्यवस्था आहे का, याकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. कारवाई केवळ प्रसिद्ध हॉटेलपुरती मर्यादित न राहता लहानमोठ्या सर्व खाद्य व्यावसायिकांपर्यंत पोहोचली पाहिजे.
नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे, हा त्यांच्या आरोग्याशी संबंधित मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यकच आहे. मात्र, कारवाईचा धडाका एखाद्या अधिकार्‍याच्या कार्यकाळापुरता मर्यादित राहता कामा नये. नियमित तपासणी, दोषींवर दंडात्मक कारवाई, परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया आणि नियमांचे पालन होते की नाही, यावर सातत्याने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आज सुरू असलेली मोहीम स्वागतार्ह असली, तरी तिचा वेग आणि सातत्य किती काळ टिकते, हेच महत्त्वाचे ठरणार आहे. अन्यथा अधिकारी बदलले की कारवाईचा जोरही कमी होईल आणि पुन्हा ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येईल.

A flurry of action—but why the neglect for all these years?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *