सिन्नर : प्रतिनिधी
शहरात वाढत्या अस्वच्छतेच्या तक्रारी आणि आरोग्य समस्यांची दखल घेत, सिन्नर नगरपरिषदेच्या आरोग्य समितीच्या पहिल्याच बैठकीत महत्त्वपूर्ण विकासकामांना मंजुरी देण्यात आली. सभापती ललिता दत्तात्रय हांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, नवीन घंटागाड्यांची खरेदी आणि कचरा विलगीकरण शेड उभारण्यावर विशेष भर
देण्यात आला.
शहरातील अनेक सार्वजनिक शौचालयांची अवस्था बिकट असून, दरवाजे तुटणे, पाण्याचा अभाव आणि अस्वच्छता अशा तक्रारी सदस्यांनी मांडल्या. यावर समितीने शहरातील सर्व 25 स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करणे, वाढत्या लोकसंख्येचा विचार करता शहरात विविध ठिकाणी पाच नवीन सार्वजनिक शौचालये उभारण्याची नगराध्यक्षांकडे शिफारस करणे, तुटलेली भांडी बदलणे, लाइट्सची सोय करणे आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावणे आदी विषय प्राधान्याने सोडवण्याचे निश्चित करण्यात आले.
कचरा व्यवस्थापन व वाहतुकीसाठी नवी यंत्रणा
कचरा संकलनाची प्रक्रिया अधिक वेगवान आणि शास्त्रोक्त करण्यासाठी समितीने कंबर कसली आहे. सध्याच्या 18 घंटागाड्या अपुर्या पडत असल्याने नवीन गाड्या खरेदीचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. चार प्रकारच्या कचर्याचे वर्गीकरण करण्यासाठी 4 कप्प्यांची शेड उभारणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर पहिली शेड उद्योग भवन परिसरात होणार आहे. घंटागाड्या उभ्या करण्यासाठी जागेची अडचण असल्याने स्वतंत्र वाहनतळाच्या प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली. खासदार पुलाजवळील जुनी तीन तोंडी विहीर ही आजही पाण्याचा मुख्य स्रोत आहे. या विहिरीची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षेसाठी त्यावर जाळी बसविण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
बैठकीस नगरसेवक पंकज जाधव, सुदर्शन नाईक, सुवर्णा उबाळे, ज्योती मोरे, लक्ष्मी पवार, कमळाबाई पगार, अशोक जाधव, अनिल सरवार तसेच मुख्याधिकारी अभिजित कदम आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
भंगार साहित्याचा लिलाव
पालिकेच्या आवारात धूळखात पडलेल्या 13 जुन्या गाड्या, 4 ट्रॅक्टर आणि इतर लोखंडी साहित्याचा लिलाव करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. यामुळे पालिकेच्या जागेची बचत होऊन महसूलही मिळणार आहे.
स्मशानभूमी विकास आणि सुरक्षा
संगमनेरनाका, तळवाडी व सरदवाडी येथील स्मशानभूमींच्या दुरवस्थेवर उपाययोजना मंजूर केल्या. लोखंडी गेट बसवणे आणि कायमस्वरूपी प्रकाशयोजना करणे, स्वच्छतागृहे उभारणे आणि कर्मचार्यांसाठी निवासस्थानाची व्यवस्था करणे याकडे प्राधान्याने लक्ष देण्यात
येणार आहे.