चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची ‘सिमा’ची मागणी
सिन्नर : प्रतिनिधी
माळेगाव औद्योगिक वसाहतीत चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने उद्योजकांत तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून औद्योगिक वसाहतीत सुरक्षिततेची प्रभावी उपाययोजना करावी, अशी मागणी सिन्नर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तथा सिमाने
केली आहे.
सातत्याने घडणार्या चोरीच्या घटनांमुळे औद्योगिक वसाहतीत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष किशोर राठी, सचिव बबन वाजे, उपाध्यक्ष किरण भंडारी, कोषाध्यक्ष राहुल नवले, तसेच विश्वस्त रतन पडवळ, मारुती कुलकर्णी, अरुण चव्हाणके, शांताराम दारुंटे, मुकेश देशमुख, शशिकांत नवले, नवनाथ नागरे, दत्ता नवले, अरुण खालकर, सुधीर जोशी आदी पदाधिकार्यांनी केली आहे. रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवावी, तसेच सकाळी व सायंकाळी वसाहतीच्या मुख्य रस्त्यांवर नियमित गस्त घालावी. त्यामुळे चोरट्यांमध्ये वचक निर्माण होईल. सध्या उपाययोजना अपुर्या असल्याने चोरटे निर्भयपणे कृत्य करत आहेत. वसाहतीतील अनेक लघुउद्योग 24 तास खासगी सुरक्षारक्षक नेमू शकत नाहीत. परिणामी, अशा उद्योगांना लक्ष्य केले जात असून, व्यावसायिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. माळेगाव औद्योगिक वसाहतीत कायमस्वरूपी पोलिस चौकी स्थापन करून आवश्यक पोलिस कर्मचार्यांची नेमणूक करावी, ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. या मागणीचा गांभीर्याने विचार करून तातडीने अंमलबजावणी करावी, अशी ठाम भूमिका सिमा संघटनेच्या पदाधिकार्यांनी घेतली आहे.
मंगळवारी रात्री माळेगाव एमआयडीसी परिसरातील आयुष मोटार रिवाइंडिंग अँड इलेक्ट्रिकल्स या कंपनीचे कुलूप तोडून चोरट्यांनी कॉपर वायर चोरी केली. यापूर्वी मागील आठवड्यात नाशिक पॉवर कंपनीमधून कॉपर चोरीची घटना घडली होती. तसेच शनिवारी आदीश इंडस्ट्रीजमध्ये संगणक व इतर साहित्य चोरीला गेले. या सर्व घटनांचा अद्यापही उलगडा झालेला नाही. यापूर्वी हिंद रेक्टीफेजमधूनही कॉपर चोरी झाली होती.