वंध्यत्वाकडे नव्या दृष्टिकोनातून:

ताणतणाव,जीवनशैली आणि होमिओपॅथीची भूमिका.

सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत मग प्रेग्नन्सी का होत नाही? फर्टिलिटी क्लिनिकमध्ये ऐकू येणारा हा केवळ एक वैद्यकीय प्रश्न नसून, त्यामागे अनेकदा न सांगता येणारी चिंता, अपेक्षांचे ओझे, सामाजिक दबाव आणि स्वतःलाच दोष देण्याची भावना दडलेली असते. गर्भधारणेला विलंब झाला की आपल्या समाजात सर्वप्रथम स्त्रीलाच लक्ष्य केले जाते. ताण जास्त आहे का? नोकरीमुळे थकवा येतो का? असे प्रश्न विचारले जातात. काही वेळा तर फक्त ताणामुळेच गर्भधारणा होत नाही, असे सांगून विषय सहजपणे टाळला जातो. परंतु, वास्तव यापेक्षा कितीतरी अधिक गुंतागुंतीचे आहे.
मानसिक ताण हा प्रत्येक व्यक्तीमध्ये वंध्यत्वाचे थेट एकमेव कारण असू शकत नाही. मात्र, दीर्घकाळचा ताण मानवी शरीरातील झोप, आहार, वजन, शारीरिक हालचाल, लैंगिक इच्छा आणि एकूण जीवनशैलीवर विपरीत परिणाम करू शकतो. ताण आणि शरीरातील हार्मोनल प्रक्रियांचा परस्परसंबंध नक्कीच आहे, परंतु ताणाला सर्वस्वासाठी दोष देण्याऐवजी त्याकडे आरोग्याच्या संपूर्ण चित्रातील केवळ एका घटकाप्रमाणे पाहणे गरजेचे आहे. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, गर्भधारणा होत नसल्याबद्दल स्त्री किंवा पुरुष यापैकी कोणालाही दोष देणे पूर्णपणे चुकीचे आहे.
गर्भधारणेची प्रक्रिया ही दोन व्यक्तींची जैविक भागीदारी आहे. स्त्रीच्या बाबतीत ओव्ह्युलेशन, पीसीओएस, एंडोमेट्रिओसिस, ट्यूबल फॅक्टर किंवा वय यांसारखे घटक महत्त्वाचे असतात, तर पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या, हालचाल आणि गुणवत्ता हे घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अनेकदा सर्व तपासण्या नॉर्मल असूनही स्पष्ट कारण सापडत नाही, ज्याला वैद्यकीय भाषेत  ‘Unexplained Infertility’ म्हटले जाते. त्यामुळे चूक कोणाची? हा प्रश्न विचारण्याऐवजी कारण काय आहे आणि पुढचे योग्य पाऊल कोणते? याचा विचार करणे बुद्धिमत्तेचे ठरते.
आजच्या गतिमान युगात करिअरची ओढ, कामाचे वाढते तास, अनियमित झोप, कमी शारीरिक हालचाल, चुकीचा आहार आणि सततचा डिजिटल वावर यांमुळे जोडप्यांचे आयुष्य व्यापले आहे.
वंध्यत्वाच्या मूल्यमापनात स्त्री आणि पुरुष दोघांच्याही वैद्यकीय तपासण्या होणे
अनिवार्य आहे.
वय, मासिक पाळीचे चक्र आणि इतर वैद्यकीय परिस्थितीनुसार योग्य वेळी फर्टिलिटी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य वजन राखण्यावर
भर द्या.
ताण लपवू नका, जोडीदाराशी मोकळा संवाद साधा आणि गरज पडल्यास समुपदेशकाची
मदत घ्या.
सोशल मीडिया किंवा नातेवाइकांच्या सल्ल्याने औषधोपचार करण्याऐवजी योग्य निदानावर लक्ष केंद्रित करा.
होमिओपॅथी किंवा कोणतीही पूरक उपचारपद्धती घेत असल्यास आपल्या मुख्य डॉक्टरांना त्याची कल्पना द्या. पुराव्यावर आधारित उपचारांना विलंब होऊ देऊ नका.
आजच्या काळात अनेक जोडपी सुरक्षित आणि दुष्परिणामरहित उपचारांसाठी होमिओपॅथीकडे वळत आहेत. होमिओपॅथिक दृष्टिकोन हा केवळ एका लक्षणावर किंवा आजारावर आधारित नसून, तो व्यक्तिकेंद्री असतो.
होमिओपॅथीमध्ये व्यक्तीचे शारीरिक आरोग्य, मानसिक स्वभाव, हार्मोनल असंतुलन आणि जीवनशैली या सर्वांचा एकत्रित विचार करून औषधयोजना केली जाते. यामुळे शरीरातील अंतर्गत यंत्रणा सुरळीत होण्यास मदत मिळते.
दीर्घकाळच्या ताणामुळे किंवा अयोग्य जीवनशैलीमुळे शरीरातील ज्या संप्रेरकांचे संतुलन बिघडले आहे, ते नैसर्गिकरीत्या पूर्वपदावर आणण्यासाठी होमिओपॅथिक औषधे पूरक ठरू शकतात.
ही औषधे अत्यंत सुरक्षित असून, त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ चालणार्‍या उपचारांमध्ये हा एक उत्तम पर्याय ठरतो.
वंध्यत्वासारख्या संवेदनशील विषयात केवळ होमिओपॅथीवर अवलंबून न राहता, आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि स्त्रीरोगतज्ज्ञ/फर्टिलिटी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबतच पूरक उपचार म्हणून होमिओपॅथीचा प्रभावी वापर केला जाऊ शकतो.

A New Perspective on Infertility:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *