भारतीय खेळाडूंच्या कामगिरीत नवी भरारी

आशियाई क्रीडा स्पर्धांत भारताची कामगिरी हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. सुरुवातीच्या काळात मर्यादित खेळांमध्ये पदके मिळविणार्‍या भारताने आता विविध क्रीडाप्रकारांत आपली ताकद सिद्ध केली आहे. भारतीय खेळाडूंच्या मेहनतीमुळे आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताची आशियाई क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक व्यापक झाली आहे.

हांगझोऊ येथे झालेल्या 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच शंभर पदकांचा टप्पा ओलांडला. भारताने या स्पर्धेत 107 पदके जिंकली. अ‍ॅथलेटिक्स, नेमबाजी, तिरंदाजी, कुस्ती, बॅडमिंटन, हॉकी व कबड्डी यांसारख्या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी उल्लेेखनीय कामगिरी केली. या यशामुळे भारतीय क्रीडा क्षेत्रात नव्या आशा निर्माण झाल्या.
नीरज चोप्रासारख्या भालाफेकपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केलेली ओळख, भारतीय महिला खेळाडूंची वाढती चमक, नेमबाजी आणि तिरंदाजीतील यश, तसेच सांघिक खेळांमधील भारताची कामगिरी यामुळे देशातील तरुणाईला क्रीडा क्षेत्राकडे वळण्याची प्रेरणा मिळत आहे. पदक जिंकणार्‍या खेळाडूंच्या यशामागे त्यांचे अनेक वर्षांचे कठोर परिश्रम, शिस्त, त्याग आणि संघर्ष दडलेला असतो. त्यामुळे त्यांच्या यशाकडे केवळ पदकांच्या आकडेवारीतून न पाहता त्यांच्या जिद्दीच्या प्रवासातून पाहणे आवश्यक आहे.
क्रीडा विकासासाठी आशियाई स्पर्धांचे महत्त्व
आशियाई क्रीडा स्पर्धा म्हणजे केवळ पदकांची चढाओढ नव्हे. या स्पर्धांमुळे विविध देशांतील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव मिळतो. त्यांना आपली क्षमता तपासण्याची, प्रतिस्पर्ध्यांकडून शिकण्याची आणि आगामी ऑलिम्पिक स्पर्धांसाठी तयारी करण्याची संधी मिळते. अनेक खेळाडूंसाठी आशियाई क्रीडा स्पर्धा हे जागतिक स्तरावरील यशाचे महत्त्वाचे पाऊल ठरते.
या स्पर्धांमुळे यजमान शहरांत क्रीडा सुविधा विकसित होतात, पर्यटनाला चालना मिळते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही हातभार लागू शकतो. मात्र, स्पर्धांसाठी उभारण्यात येणार्‍या सुविधांचा उपयोग स्पर्धा संपल्यानंतरही सर्वसामान्य नागरिकांना आणि नवोदित खेळाडूंना झाला पाहिजे. क्रीडा सुविधांची निर्मिती करताना दीर्घकालीन नियोजन आणि सार्वजनिक पैशांचा योग्य वापर यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.
भारतासमोरील आव्हाने
आणि पुढील दिशा
भारतात क्रिकेटला मोठी लोकप्रियता आणि आर्थिक पाठबळ मिळत असले, तरी इतर खेळांनाही समान संधी, सुविधा आणि प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत; परंतु योग्य प्रशिक्षण, दर्जेदार क्रीडा साहित्य, प्रशिक्षक, आहार व आर्थिक मदतीच्या अभावामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
देशातील क्रीडा धोरण आखताना केवळ पदक विजेत्यांचा गौरव करून चालणार नाही, तर पदकासाठी प्रयत्न करणार्‍या खेळाडूंनाही आवश्यक आधार मिळायला हवा. शालेय स्तरापासूनच खेळांना प्रोत्साहन देणे, ग्रामीण भागात क्रीडा अकादमी उभारणे, महिला खेळाडूंना सुरक्षित आणि समान संधी उपलब्ध करून देणे, तसेच प्रशिक्षकांच्या गुणवत्तेत सुधारणा करणे आवश्यक आहे.
खेळाडूंच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना पदकांबरोबरच त्यांच्या प्रशिक्षणाच्या सुविधा, दुखापतींवरील उपचार, मानसिक आधार आणि निवृत्तीनंतरच्या सुरक्षिततेचाही विचार व्हायला हवा. खेळाडू घडवणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून क्रीडा संघटना, शैक्षणिक संस्था, पालक आणि समाज यांनीही त्यासाठी योगदान देणे आवश्यक आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धा हा आशियाच्या क्रीडा सामर्थ्याचा, एकतेचा आणि खिलाडूवृत्तीचा उत्सव आहे. या स्पर्धांमधील प्रत्येक पदक हे खेळाडूच्या मेहनतीचे, प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि देशाच्या क्रीडा व्यवस्थेच्या प्रयत्नांचे प्रतीक असते. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धांत मिळविलेले यश निश्चितच प्रेरणादायी आहे. मात्र, या यशाचे सातत्य टिकविण्यासाठी क्रीडा क्षेत्रात पायाभूत बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
पदकांची संख्या वाढवणे हे महत्त्वाचे असले, तरी प्रत्येक गुणवंत खेळाडूला संधी मिळवून देणे, हे त्याहून मोठे उद्दिष्ट असले पाहिजे. आशियाई क्रीडा स्पर्धांमधून प्रेरणा घेऊन भारताने क्रीडासंस्कृती अधिक व्यापक करावी. देशातील प्रत्येक गावातून, प्रत्येक शाळेतून आणि प्रत्येक कुटुंबातून नवे खेळाडू घडावेत. भारतीय तिरंगा आशियाई क्रीडांगणावर सातत्याने अभिमानाने फडकत राहावा आणि भारत जागतिक क्रीडा क्षेत्रातही आपली ओळख अधिक बळकट करावा, हीच अपेक्षा!

A New Surge in Indian Athletes’ Performance

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *