युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन-युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या यावर्षीच्या आमसभेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानसह आठ युद्धे थांबविल्याचा पुनरुच्चार केला. भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झालंच नव्हतं. दहशतवाद्यांविरुद्ध भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. त्याला ट्रम्प युद्ध म्हणत आहेत. कोणाच्याही मध्यस्थीने ऑपरेशन सिंदूर थांबविण्यात आले नाही, असे भारताने स्पष्ट केले असतानाही ट्रम्प महाशय पुनः पुन्हा भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचे तुणतुणे वाजवत आहेत. एखादी खोटी गोष्ट शंभर वेळा सांगितली की, लोकांना ती खरी वाटते, या गोबेल्स नीतीचा वापर करून ट्रम्प महाशय कथित भारत-पाकिस्तान युद्धाचा जाणूनबुजून उल्लेख करत असल्याचे दिसू लागले आहे. एखादी गोष्ट आत्मविश्वासाने सांगितली, तर लोकांचा तिच्यावर विश्वास बसतो आणि ती गोष्ट खरी वाटते. याला गोबेल्स तंत्र म्हणतात. जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरचा प्रचारमंत्री जोसेफ गोबेल्स याला खोट्या प्रचाराचा मास्टर म्हटले जायचे. खोटी गोष्ट तो वारंवार सांगत असायचा. नंतर तिच्यावर लोकांचा विश्वास बसायचा. एखादी खोटी गोष्ट शंभर वेळा सांगितली की, लोकांचा तिच्यावर विश्वास बसतो, याला गोबेल्स तंत्र किंवा नीती म्हणतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याच तंत्राचा किंवा नीतीचा वापर करत जगातील आठ युद्धे थांबविल्याचे तुणतुणे वाजवत आहेत. आठ युद्धे थांबवल्याचा दावा ट्रम्प एक वर्षापासून करत आहेत. इस्रायलच्या संसदेत 13 ऑक्टोबर 2025 रोजी केलेल्या भाषणात त्यांनी हा दावा केला होता. त्याआधी ते सात युद्धे थांबविल्याचा दावा करत होते. आठ महिन्यांत युद्धे थांबवली म्हणून शांततेचे नोबेल पारितोषिक मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. अमेरिकेच्या विदेश विभागाने 14 ऑक्टोबर 2025 रोजी सोशल मीडियावर आठ महिन्यांत आठ युद्धे संपवणारे शांततेचे अध्यक्ष अशा आशयाची पोस्ट शेअर करून या नोबेल दाव्याला अधिकृत प्रसिद्धी दिली होती. ट्रम्प यांना नोबेल मिळाले नाही, तरीही त्यांनी आठ युद्धे थांबविल्याच्या दाव्यावर पाणी सोडलेले नाही. आठ युद्धे थांबविल्याची हुक्की ट्रम्प यांना अधूनमधून येत असते. गेल्या वर्षीच्या (2025) आमसभेत त्यांनी सात युद्धेे थांबविल्याचा दावा करत युनो शांततेसाठी काहीच कामाची नाही, अशी टीका करून युनोचे काम ’मीच’ करत असल्याचा दावाही केला होता. ट्रम्प महाशय कधी कशावर दावा करतील, याचा काही नेम नाही. भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा दावा ते करत असले, तरी त्यात अजिबात तथ्य नाही. मुळात भारताने पाकिस्तानशी युद्ध पुकारले नव्हते. काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात 26 जण ठार झाले. हल्ल्यात अनेकींच्या पतीची हत्या झाली आणि त्यांचे कुंकू पुसले गेले. दहशतवादी पाकिस्तानातील होते. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी भारतीय लष्कराने जी मोहीम हाती घेतली तिला ’ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले. या ऑपरेशनने पाकिस्तान सरकार आणि लष्कर गांगरून गेले. भारताने युद्ध पुकारल्याचा समज करून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांच्याशी संपर्क साधला होता. भारत- पाकिस्तानमधील संघर्ष वाढू नये आणि युद्धविराम व्हावा, यासाठी त्यांनी अमेरिकेची मदत मागितली होती. प्रत्यक्षात हे युद्ध नव्हते; परंतु ट्रम्प यांनी युद्धाचे स्वरूप दिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि शंभराहून अधिक दहशतवादी मारले गेले. ही कारवाई 7 मे 2025 रोजी सुरू झाली आणि 10 मे 2025 रोजी संध्याकाळी पाच वाजता संपली. दोन्ही देशांच्या लष्करी परिचलन महासंचालकांनी लष्करी कारवाया थांबवण्यावर सहमती दर्शवली होती. यात तिसर्या कोणत्याही देशाचा मध्यस्थ नव्हता. ऑपरेशन सिंदूर थांबले ते ट्रम्प यांच्या मध्यस्थीने नव्हे. तरीही ते महाशय फुकटचे श्रेय घेत आहेत. ऑपरेशन सिंदूर अमेरिकेच्या मध्यस्थीने थांबविण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला होता. या आरोपाचा इन्कार सरकारने अनेकदा केला. कोणाच्याही मध्यस्थीने ऑपरेशन सिंदूर थांबविण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत दिले होते. एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगून ती खरी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न ट्रम्प करत आहेत. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबविल्याचे श्रेय त्यांनी आतापर्यंत 150 हून अधिक वेळा घेतले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायचा काय? हा प्रश्न आहे. त्यांच्या दाव्यावर भारताने पुन्हा एकदा निक्षून स्पष्टीकरण दिले पाहिजे. मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री जगजाहीर आहे. युद्ध थांबविल्याचा दावा ट्रम्प जेव्हा करतात, तेव्हा भारतात विरोधी पक्षांना मोदी सरकारकडे खुलासा मागण्याची संधी मिळते आणि टीका करण्यास वाव मिळतो. आमसभेत ट्रम्प यांनी प्रचारकी भाषण केले. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत होणार्या मध्यावधी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी यापूर्वी मांडलेल्या भूमिकांची उजळणी केली. भाषण न्यूयॉर्कमध्येच असल्याने त्याने अमेरिकन नागरिकांचे लक्ष वेधून घेतले असेलच. करार केला नाही तर इराणचे उच्चाटन, इराणला अण्वस्त्रे बनवता येणार नाहीत, क्यूबातील कम्युनिस्ट सरकार जाणार, रशिया-युक्रेन युद्धविराम लवकरच होणार, अमेरिकेच्या सीमेवर गुन्हेगारी
कार्टेल्सचे नियंत्रण खपवून घेतले जाणार नाही-मेक्सिकोला इशारा, आठ युद्धे संपवली इत्यादी मुद्द्यांचा त्यांनी पुनरुच्चार केला. त्यात कथित भारत-पाकिस्तान युद्धाचा आवर्जून उल्लेख केला. अमेरिकेच्या निवडणुकीत विदेश धोरणाला महत्त्व असते म्हणून ट्रम्प यांनी आमसभेत अमेरिकेचे विदेश धोरण मांडले. जुने मुद्दे परत परत सांगायची ट्रम्प यांनी सवय आहे. एकच गोष्ट अनेकदा सांगितली की, लोकांचा तिच्यावर विश्वास बसतो, असे ट्रम्प यांना वाटत असावे, पण भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याच्या त्यांच्या बढाईखोर दाव्यावर भारताचा विश्वास नाही, याकडे ते दुर्लक्ष करत आले आहेत. ट्रम्प ते ट्रम्प आपला हेकटपणा सोडणार नाहीत.
The monotonous refrain about the war ending