स्त्री अस्तित्वासाठी गरुडझेप घेणारी कलाकृती : आयुष्याची नवी पहाट

नागपूरच्या कवयित्री सौ. निशा खापरे यांची आयुष्याची नवी पहाट ही काव्य साहित्य कलाकृती नुकतीच वाचनात आली.
कुणाच्याही मदतीला नि:स्वार्थ भावनेने धावून जाणारी आई, जिने संस्कारच दिले नाही तर माणूस म्हणून घडविले त्या देवतुल्य असणार्‍या आईला अर्थात स्वगीर्र्य हिरूबाई वानखडे हिच्या चरणी ही पहिली कलाकृती अर्पण करून कवयित्री सौ. निशा खापरे यांनी केवळ आई म्हणूनच नाही तर सबंध स्त्री व्यक्तिमत्त्वाची कृतज्ञता व्यक्त केली.
कवयित्री निशा खापरे यांनी आईविषयीच्या भावना, तिच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना आई या कवितेत म्हणतात की,
तुझ्याच रूपे आहे माझे आज अस्तित्व.
तुझ्या छायेत शिकले सारे आयुष्यतत्व
आयुष्याची वाट घालता सोसले घाव,
डगमगली ना वादळातही मनाची नाव
तुझ्या संगती या जगण्याचे कळले महत्त्व.
म्हणूनच मुख्यपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी हाच संदर्भ घेऊन या कलाकृतीच्या मुखपृष्ठावर एका प्रतीकात्मक स्त्रीरूपातील आईची रेखांकित केलेली छबी वाचकांचे लक्ष वेधून घेते..
निशा खापरे लिखित आयुष्याची नवी पहाट या कलाकृतीचे मुखपृष्ठ हे केवळ दिखाऊ नसून त्यात स्त्रीच्या, भावना, संवेदना, मनाची कोमलता आणि मनाची नैसर्गिक सुंदरता जपली आहे. कलाकृतीच्या आतील साहित्याला मुखपृष्ठावर रेखाटणे म्हणावी तेवढी सोपी कला नाही, त्यासाठी साहित्याशी, चित्राशी एकरूप व्हावे लागते आणि ही कला मुखपृष्ठचित्रकाराने लिलया हस्तगत केली आहे.
आयुष्याची नवी पहाट या कलाकृतीच्या शीर्षकाचा जर विचार केला तर असे लक्षात येते की, स्वातंत्र्यपूर्व काळात स्त्री शिक्षणाचा अधिकार नव्हता, चूल आणि मूल या चक्रव्यूहात अडकलेली स्त्री परंपरेच्या, खुळचट रीतिरिवाजाच्या साखळदंडाने जखडून टाकली होती. मात्र, आता ही स्त्री शिकली आहे. आयुष्याच्या अंधारवाटेवरून चालताना संकटांच्या खाचखळग्यातून नव्या उजेडाच्या दिशेने गेलं पाहिजे हाच विचार मनात धरून स्त्रीने परंपरेला आता बदललं पाहिजे, कधीकाळी व्यवस्थेच्या आगीत जळून स्वप्नांची राख झाली असेल, पण आता स्वप्नाना कवटाळून न बसता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतूनही आकाशात गगनभरारी घेण्याचं बळ पंखात एकवटून पुन्हा नव्या आयुष्यासाठी, नव्या ध्येयासाठी, स्वअस्तित्वासाठी नवी पहाट घेऊन हीच स्त्री आकाशात गरूडझेप घेऊ लागली आहे याच अर्थाने या कलाकृतीचे शीर्षक रेखाटले असावे असे मला वाटते आणि म्हणूनच अस्तित्वाची गरुडझेप या कवितेत कवयित्री म्हणतात की, आता पुढ्यात ठेवलेल्या अंधार पाऊलवाटेला ठोकरून उजळून टाकले मी आंतरिक नवतेजाने छाटलेल्या पंखात स्वबळाचे सामर्थ्य भरून घेऊ लागली आहे नव्या अस्तित्वाची गरुडझेप.
आयुष्याची नवी पहाट या कलाकृतीच्या मुखपृष्ठावरील प्रतीकात्मक असलेल्या स्त्रीच्या खांद्यावरील पदरावर उगवता सूर्य दाखवला आहे, हा सूर्य स्त्री संघर्षातून कालच्या निबीड अंधाराला छेदून उद्याच्या, नव्या उमेदीच्या, नवक्रांतीच्या प्रकाशाच्या वाटा दाखविणारा आहे. स्त्रीयांच्या आयुष्यात ही प्रकाशाची वाट दाखविणारी पहिली स्त्री क्रांतिज्योती सावित्रीबाई
फुले यांनी प्रचंड संघर्ष करून आजच्या स्त्रीला प्रकाशाची वाट दाखवली आहे, त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खर्‍या अर्थाने सूर्य बनून अंधारवाटेत चाचपडत असलेल्या समाजाला आयुष्याची नवी पहाट दाखवली आणि म्हणूनच प्रकाशाच्या वाटा दाखविणार्‍या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करताना संघर्ष सावित्रीचा या कवितेत कवयित्री सौ. निशा खापरे लिहितात की,
शिक्षणाची पेटवून ज्योत
उजाळल्या दिशा जीवनाच्या,
निशेच्या काळोखाला छेदून
दाखविल्या वाटा प्रकाशाच्या.
आयुष्याची नवी पहाट या कवितासंग्रहात एकूण 92 कवितांचा समावेश असून, बहुतांश कविता स्त्रीपात्राच्या भोवती वलयांकित झालेल्या दिसतात. तिची काटेरी वाट, जागवलेले स्वप्न, स्वर्ग सुखाचा, वाटा, स्त्रीभ्रूणाचे मनोगत, वात्सल्यझरा, कोंडमारा, बाईपण, या कविंतामधून स्त्रीवर्गाच्या संवेदना, वेदना, सल, आशा-आकांक्षा, नवी चेतना, नवी उमेद, जिद्द अशा अनेक अंगांनी व्यक्त झालेली स्त्री रेखाटली आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर तांडेकर प्रदत्त यांनी ब्लर्बच्या माध्यमातून कलाकृतीची केलेली पाठराखण कवयित्रीच्या साहित्यिक यशाला गवसणी घालणारी असून अविशा प्रकाशन यांनी कलाकृतीला प्रकाशात आणून आयुष्याची नवी पहाट दाखवली आहे. कोणत्याही कलाकृतीचे बाह्यसौंदर्य हे कलाकृतीला साहित्य जगतात मोलाचे स्थान मिळवून देणारे असते आणि म्हणूनच मुख्यपृष्ठचित्रकार अरविंद शेलार यांनी अत्यंत कलात्मकता, कल्पकता आणि कवयित्रीच्या मनातील वास्तवता जपून कलाकृतीला साजेसे मुखपृष्ठ सजवून साहित्य प्रांतात नवी ओळख करून दिली आहे.
प्रसिद्ध समीक्षक डी. बी. जगत्पुरिया यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण कलाकृतीसाठी दिलेली प्रस्तावना समस्त कवींना नवप्रेरणा देणारी आहे.

 

A work of art that takes a leap for the existence of women: A new dawn of life

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *