वृद्ध मनाची हाक…

घरात वयस्कर माणसं असणं म्हणजे घरात देवाचं अस्तित्व असणंपण कधीकधी आपण नकळत त्यांच्याकडून त्यांच्या जगण्याचं कारणच हिरावून घेतो आणि मग घरात चिडचिड, भांडणं, एकटेपणा आणि भावनिक अंतर वाढायला लागतं
ज्या घरात माया, समजूतदारपणा आणि आपलेपणा असतो, तिथेच नात्यांचं सुंदर विश्व फुलतं अन्यथा अहंकार, टोमणे आणि दुरावा यामुळे घराला वाळवी लागायला वेळ लावत नाही, घरात संवाद आणि आपलेपणा असेल, तर कुण्या तिसर्‍याची गरज भासत नाही. आणि जिथे संवाद हरवतो, तिथे घराला घरपण उरत नाही. आणि मग मात्र मोठ्या बंगल्या पेक्षा प्रेमाने भरलेली झोपडी मनाला जास्त सुख देऊन जाते.
आज शाळेत शिकलेली कविता आठवली…
“घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती,
तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती…” खरंच… घर मोठं असण्यापेक्षा, मनं मोठी असणं जास्त गरजेचं असतं……
आजकाल मुलं आई-वडिलांना सुख द्यावं म्हणून प्रत्येक कामासाठी नोकर ठेवतात, बाहेरून जेवण मागवतात, ऑनलाइन सगळं आणतात. त्यांना वाटतं आता आई-बाबांनी फक्त आराम करावा, पण खरंच माणूस फक्त आरामाने आनंदी राहतो का? नाही! माणसाला गरज असते “आपण अजून कोणासाठी तरी महत्त्वाचे आहोत” या भावनेची. “हातातील काम गेलं की, मनातली उमेदही हरवते आणि माणूस जगत असूनही हळूहळू आतून संपत जातो.” पूर्वी आजी स्वयंपाकघरात रमायची, आजोबा बाजारातून भाजी आणताना दहा दुकानं फिरायचे, त्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे त्यांचा दिवस, त्यांचा आनंद, त्यांचं अस्तित्व होतं. पोळ्या लाटताना फक्त जेवण बनत नव्हतं, तर घरात मायेचा सुगंध पसरत होता, भाजीवरून होणारी छोटी भांडणं म्हणजे राग नव्हता, तो संवाद होता आपलेपणा होता, पण जेव्हा सगळी कामं दुसर्‍यांकडे गेली, तेव्हा हात रिकामे झाले आणि त्यासोबत मनही शरीराला हालचाल नाही, मनाला जबाबदारी नाही, कोणाला आपल्या मदतीची गरज नाही, मग सुरू होतं एकटेपण चिडचिड राग आणि नकळत नैराश्य “वृद्धापकाळाला औषधांची नाही, तर माणसांच्या सहवासाची गरज असतेआणि ‘तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात’ या चार शब्दांची उब पुरेशी असते.”
वयस्कर माणसांना फक्त आराम देऊ नकात्यांना घरातलं स्थान द्या, त्यांचा सल्ला विचारा, एखादी भाजी त्यांच्या हातची बनू द्या, घरातील छोट्या मोठया गोष्टीत त्यांना सहभागी करा, कारण, सुख हे फक्त महागड्या सोयींमध्ये नसतं, तर ‘आपण अजूनही आपल्या माणसांसाठी उपयोगाचे आहोत’ या भावनेत असतं, घरातली वयस्कर माणसं ही ओझं नसतातती घराचा अनुभव, आशीर्वाद आणि जिवंत संस्कार असतात. आजच्या मोबाईलच्या जगामुळे वाढलेलं एकटेपण, “वेळ नाही” म्हणणारी मुलं आणि शांत होत चाललेले आई-वडील… निवृत्तीनंतर अचानक रिकामं पडलेलं आयुष्य, वयस्कर माणसांना पैशांपेक्षा संवादाची गरज असते. नातवंडांसोबतचा वेळ त्यांना पुन्हा जिवंत करतो. “तुम्ही थकला असाल” एवढं विचारणंही त्यांच्यासाठी प्रेम असतं. वृद्धापकाळात शरीरापेक्षा मन जास्त थकतं.आई-वडील म्हातारे होत नाहीत फक्त वय वाढतंआणि त्यांना पुन्हा लहान मुलासारखी माया, आपुलकी आणि दोन प्रेमाचे शब्द हवे असतात. नातवंडांनाही आजी-आजोबांच्या कुशीतलं प्रेम, त्यांच्या गोष्टी, त्यांचा सहवास आणि त्यांचे प्रेमळ लाड हवे असतात, पण आज घरातल्या ताणतणावामुळे, चिडचिडीच्या वातावरणामुळे हे सुंदर नातं हळूहळू विरळ होत चाललं आहे. मोबाईल जवळ आले पण माणसं मात्र एकमेकांपासून दूर गेली. आजी-आजोबा हे नातवंडांच्या आयुष्यातलं सर्वात सुंदर प्रेम असतं, नातवंडांच्या गोड हसण्यात, त्यांचं सुख दडलं प्रत्येक क्षणात त्यांच्या गोष्टींमध्ये माया असते, आशीर्वादात ताकद असते, आणि त्यांच्या सहवासात घराचं खरं सुख दडलं असतं” शेवटी एवढंच “माणसं गेल्यावर त्यांच्या वस्तू राहतात पण त्यांचा आवाज, स्पर्श आणि माया पुन्हा कधीच परत येत नाही”, “एक दिवस घरातली ती रिकामी खुर्ची खूप आठवेल, मग लक्षात येईल, घरात आवाज करणारी माणसं त्रासदायक नव्हती, तीच तर घरची खरी जिवंतपणाची साक्ष होती!
“आजी-आजोबा हे नातवंडांच्या आयुष्यातलं सर्वात सुंदर प्रेम असतं, त्यांच्या गोष्टींमध्ये माया असते, आशीर्वादात ताकद असते, आणि त्यांच्या सहवासात, घराचं खरं सुख दडलं
असतं.” शेवटी एवढंच “माणसं गेल्यावर त्यांच्या वस्तू राहतात पण त्यांचा आवाज, स्पर्श आणि माया पुन्हा कधीच परत येत नाही.” “मोबाइलच्या स्क्रीनपेक्षा थोडा वेळ आई-वडिलांसाठी काढा. कारण एक दिवस त्यांच्या आठवणी राहतील, पण हाक मारायला ते नसतील” एक दिवस फोटो उरतील भिंतीवर, आणि आठवणी राहतील मनावर आणि मग कायमची शांत होईल, “वृद्ध मनाची हाक…”

The call of an old mind…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *