अपघातांची लिंक

भरधाव बसेसमुळे नागरिकांचा जीव धोक्यात !

नाशिक : प्रतिनिधी शहर वाहतुकीच्या सिटीलिंकने उडविल्यामुळे वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली . यापूर्वीही सिटीलिंकच्या धडकेत अथवा बसखाली येऊन नागरिक मृत्युमुखी पडल्याचे प्रकार घडले आहेत . सुसाट वेगाने धावणाऱ्या या बसेसमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागत असल्याचे चित्र आहे . महापालिकेने सिटीलिंक कंपनीला शहर वाहतूक बस चालविण्याचा ठेका दिलेला आहे . कंपनीने चालकांची भरती केली असली तरी सर्व चालक बस सुसाट वेगाने चालवितात . शिवाय बसला थांबण्यासाठी शहरातील जुन्या व काही नवीन थांबे निश्चित केलेले आहेत . मात्र , सिटीलिंकची बस बऱ्याचदा थांब्यापेक्षा भररस्त्यात उभी केली जाते . त्यामुळे प्रवासी उतार चढ मांना होईपर्यंत वाहतुकीचीही कोंडी होते . सीबीएस ते अशोक स्तंभ आणि रविवार कारंजा , या परिसरात रस्त्याच्या कडेलाच अनेक वाहने पार्क केलेली असतात . त्यात सिटीलिंकच्या बस संपूर्ण रस्त्यातच गुंतवून टाकते . त्यामुळे इतर वाहनांना लवकर ओव्हरटेकही करता येत नाही . सीबीएसजवळ तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थांबा दिलेला आहे . मात्र , बस भररस्त्यातच उभ्या केल्या जातात . त्यामुळे वाहतुकीची तर कोंडी होतेच ; शिवाय नागरिकांनाही उतार चढ करताना अडथळे येतात .

वेगावर नियंत्रण हवे

सिटीलिंकच्या बसेस शहराच्या मध्यवस्तीतून धावत असताना वेगाची मर्यादा ठरवून दिलेली असली तरी त्याचे पालन चालकांकडून होत नाही . मध्यंतरी मद्यधुंद अवस्थेतील एका चालकाला नागरिकांनीच बदडले होते . गर्दीतूनही बसेस सुसाट धावतात . त्यातून अपघातांचे प्रकार घडतात . बसेसचा वेग कमी करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे .

सिव्हिलजवळ बसेसची रांग

जिल्हा शासकीय रुग्णालयाजवळ तर सिटीलिंकच्या बसेस भररस्त्यातच उभ्या केलेल्या असतात . जवळच सिटीलिंकचे कार्यालय आहे . या बसेस रस्त्याच्या कडेला उभ्या करून चालक – वाहक या ठिकाणी उभे असतात . त्यामुळे जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिकांनाही मोठा अडथळा निर्माण होतो . आधीच स्मार्टसिटीच्या कामांमुळे ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवलेले आहेत . त्यामुळे नागरिकांना वाहने चालविताना एकीकडे तारेवरील कसरत करावी लागत असताना , दुसरीकडे भररस्त्यात उभ्या राहणाऱ्या या बसेसमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *