एआयद्वारे बनावट फोटो प्रसारित करणार्‍यांवर कारवाई

मंत्री गिरीश महाजन यांचे आक्षेपार्ह मॉर्फ फोटो व्हायरल

नाशिक : प्रतिनिधी
काही अज्ञात व्यक्तींनी बनावट सोशल मीडिया अकाउंट्सच्या माध्यमातून मंत्री गिरीश महाजन यांचे छायाचित्र कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मॉर्फ करून प्रसारित केल्याचा प्रकार समोर आला आहे. या छायाचित्रांचा वास्तवाशी कोणताही संबंध नसून, ती पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत संबंधितांविरोधात नाशिक व मुंबई पोलीस आयुक्तालयांकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बनावट छायाचित्रे तयार करणे, ती प्रसारित करणे, शेअर करणे अथवा बदनामीकारक मजकूर पसरविणार्‍या सर्व संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांना अशा खोट्या व दिशाभूल करणार्‍या पोस्ट, फोटो किंवा संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अशा प्रकारची माहिती पुढे पाठविणे किंवा प्रसारित करणे टाळावे, अन्यथा संबंधित व्यक्तींनाही कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
खोटी माहिती पसरवू नका, सत्याची साथ द्या आणि जबाबदार नागरिक बना, असे आवाहन गिरीश महाजन यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनावट
फोटो तयार करून त्यासोबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका फेसबुक खात्याद्वारे मंत्री गिरीश महाजन यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार केलेेले अथवा मॉर्फ केलेले फोटो वापरून बदनामीकारक आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करण्यात आल्या आहेत. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी गुन्हा
नोंदविला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोरडे करीत असून, संबंधित आरोपीचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर कोणतीही माहिती किंवा छायाचित्रे प्रसारित करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Action against those circulating AI-generated fake photos

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *