अधिक मासानंतर लग्नसराईला पुन्हा सुरुवात

अवघ्या महिनाभरात 14 मुहूर्त, मंगल कार्यालये, बँक्वेट हॉल हाउसफुल

निफाड : विशेष प्रतिनिधी
अधिक मासामुळे जवळपास एक महिना स्थगित झालेल्या विवाह सोहळ्यांना शुक्रवार(ता. 19)पासून पुन्हा सुरुवात झाली. यंदाच्या लग्नसराईला केवळ महिनाभराचा कालावधी उपलब्ध असल्याने परिसरात लग्नांची लगबग सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या कालावधीनंतर लगेचच सिंहस्थ (गुरू अस्त) काळ सुरू होणार असल्याने अनेक कुटुंबांनी पहिल्याच उपलब्ध मुहूर्तावर विवाह सोहळे पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदू धर्मपरंपरेनुसार विवाहासाठी शुभ मुहूर्ताला विशेष महत्त्व असल्याने अधिक मासात रखडलेले विवाह आता मार्गी लागणार आहेत. परिणामी, वधू-वरांसह त्यांच्या कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विवाहाच्या तयारीसाठी कपडे, दागिने, सजावट, भोजन व्यवस्था, वधू-वरांचे फोटोशूट, वाहन व्यवस्था आदी सर्वच क्षेत्रांत मोठी धावपळ सुरू झाली आहे. यंदा जून आणि जुलै महिन्यात मिळून केवळ 14 मुख्य व आपत्कालीन विवाह मुहूर्त उपलब्ध आहेत. त्यामुळे निफाड आणि परिसरातील सर्व मंगल कार्यालये, लॉन्स, बँड पथके, केटरर्स, सजावट व्यावसायिक, फोटोग्राफर आणि पुरोहित यांची बुकिंग जवळपास पूर्ण झाली आहे. अनेक ठिकाणी इच्छित तारखा उपलब्ध नसल्याने कुटुंबीयांना पर्यायी मुहूर्त स्वीकारावे लागत आहेत. नैताळे येथील आनंद पॅलेस या लॉन्सचे मालक शिवाजी बोरगुडे यांनी सांगितले की, उपलब्ध सर्व विवाह तारखांचे बुकिंग जवळपास
हाउसफुल्ल झाले असून, आगामी महिनाभर परिसरात विवाह सोहळ्यांची मोठी धूम पाहायला मिळणार आहे. भर पावसाळ्यातही सनई-चौघड्यांचे मंगल स्वर घुमणार असल्याचे चित्र पाहावयास मिळणार आहे.

उपलब्ध विवाह मुहूर्त

जून : 19, 20, 22, 23, 24, 27, जुलै : 1, 2, 3, 4, 7, 8, 11. दरम्यान, दाते पंचांगानुसार जानेवारी 2027 पर्यंत पुन्हा विवाहासाठी नियमित शुभमुहूर्त उपलब्ध होणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे गौण व आपत्कालीन तिथींचाही विचार करून विवाह निश्चित करत आहेत.

पुढील काही महिन्यांत नियमित विवाह मुहूर्त नसल्याने पालकांनी साखरपुड्यासह विवाह सोहळाही एकाच कार्यक्रमात उरकण्यास प्राधान्य दिल्यास वेळ, खर्च आणि नियोजन या तिन्ही बाबतीत मोठी सोय होईल. विवाहाशी संबंधित सर्व व्यावसायिकांनाही यामुळे मोठी आर्थिक संधी उपलब्ध झाली आहे. गावोगावी सुरू झालेल्या लग्नाच्या तयारीमुळे परिसरात पुन्हा एकदा उत्साहाचे आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.
-राहुल कुलकर्णी, पुरोहित, निफाड

Wedding season resumes after Adhik Maas.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *