वाहतूक शाखेची नोव्हेंबर महिन्यात धडक कारवाई
पंचवटी : प्रतिनिधी
शहरातील वाहतुकीतील बेशिस्तपणा कमी व्हावा, यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे नोव्हेंबर महिन्यात 676 रिक्षांवर कारवाई करण्यात आली. तर मुदतीनंतरही प्रवासी वाहतूक करणार्या 41 रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या आहेत. तसेच मोटार वाहन कायद्यानुसार ई-चलानव्दारे रिक्षा व इतर वाहनांवर विविध शीर्षकाखाली एकूण 9857 केसेस व 68,80,015 रुपये ऑनलाइन स्वरूपात दंड आकारण्यात
आला आहे.
कारवाईचा उद्देश वाहतूक नियमांचे पालन करण्याची शिस्त लावणे तसेच शहरातील वाहनचालक व पादचारी नागरिकांची रहदारी सुरळीत व सुरक्षित असावी हा आहे. शहरातील वाहनचालक हे सिग्नल जंप करणे, स्टॉपलाइनवर न थांबणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, सीटबेल्ट न लावणे, वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, ट्रिपल सीट बसणे, रिक्षाचालकांनी जादा प्रवासी वाहतूक करणे, युनिफॉर्म न घालणे, लायसन्स व परवाना सोबत न बाळगणे, काळी फिल्मचा काचेवर वापर करणे, फॅन्सी नंबरप्लेट लावणे, विनानंबर प्लेट वाहन चालविणे, कालबाह्य मुदतीचे वाहन चालविणे, वाहतुकीस अडथळा होईल असे बेशिस्तपणे रस्त्यांवर वाहन पार्क करणे यामुळे नाशिक शहरातील वाहतूक समस्या व अपघातांच्या प्रमाणात होत असलेली वाढ रोखणे हा मुख्य उद्देश आहे.
टोईंग कारवाई
शहरातील प्रमुख मार्गावर तसेच मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मार्केट परिसरात रस्त्यावर दुचाकी, चारचाकी यांच्या अवैध पार्किंगमुळे होणार्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. रस्त्यांवरील अनधिकृत पार्किंगमुळे रस्ते मार्ग अडथळीत होत आहेत, अशी अवैधपणे उभी केलेली वाहने टोईंग कारवाई सुरू करून उचलण्यात येणार आहेत. म्हणून नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर इतरत्र पार्क न करता अधिकृत पार्किंगमध्ये पार्क करावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेने केले आहे.
खासगी वाहतूक थांब्यांचे व्यवस्थापन
सध्या मनपा, राष्ट्रीय महामार्ग व वाहतूक विभागाच्या समन्वयातून वाहतूक व पार्किंग नियोजन करण्यात येत आहे. व्दारका येथील धुळे बाजूकडील उड्डाणपुलाखाली काळीपिवळी टॅक्सी थांबे स्थलांतरित करण्यात आले आहेत याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच शहरातील खासगी ट्रॅव्हल्स बस पार्किंग थांबे हे तपोवन सिटीलिंक डेपोजवळ मनपा नाशिकमार्फत शिफ्ट करण्यासाठी पाठपुरावा करून लवकरात लवकर स्थलांतरित केली जाणार आहेत.
30 रस्ते व 4 उड्डाणपुलांचे काम होणार
रस्ते विकासकाम व वाहतूक व्यवस्थापन सध्या शहरातील रस्त्यांची दुरुस्ती, खोदकाम, पाइपलाइन टाकणे, केबल टाकणे इत्यादी कामे सुरू असून, येथून पुढे आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 निमित्ताने 30 रस्ते व 4 उड्डाणपुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे. ही कामे मार्च 2027 पावेतो होणार आहेत. या कामांमुळे शहरामध्ये मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सदरची कामे ही रात्रीच्या वेळी करावीत किंवा कमी रहदारीच्या वेळी करावी, असे प्रस्तावित केले आहे. रस्ताकामाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापन करण्यासाठी मनपा नाशिक व राष्ट्रीय महामार्ग, स्मार्टसिटी नाशिक यांच्याकडील ट्रॅफिक वार्डन घेऊन सर्व पंक्चर व डायवर्जन पॉइंट्सवर वाहतूक पोलिसांसोबत नेमण्यात येणार आहे. शहरातील सुरू असलेली सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने टप्प्याटप्प्यात करावी, ज्याचा वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार नाही, असे प्रस्तावित केले आहे.
आवाहन – वाहतूक नियमांचे पालन न करणार्या वाहनचालकांवर सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेर्यांव्दारे ऑनलाइन ई-चलान कारवाई करण्यात येईल. जे वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर पोलीस व आरटीओमार्फत वेळोवेळी विशेष मोहीम राबवून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. सदर कारवाई यापुढेही सतत सुरू राहणार आहे. शहरातील आपण सर्व नाशिककरांनी मिळून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे. तसेच वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
– अद्विता शिंदे, सहायक पोलीस आयुक्त, शहर वाहतूक विभाग
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…