अतिक्रमणकडून शहरात मोहीम
नाशिक : प्रतिनिधी
शहरात अतिक्रमणाबरोबर अनधिकृत फलक लावणार्यांचे पेव फुटले आहे. दरम्यान, अतिक्रमण अनधिकृत होर्डिंग, बॅनर, बोर्डवर कारवाईला सुरवात केली आहे. 1 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीत तीन हजार 101 अनधिकृत फलक, बॅनरवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, तसेच शासकीय जागांवरील अनधिकृत फलकांवर कारवाई केली जात आहे. परवानगीशिवाय जाहिरात फलक लावणार्यांवर पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आणखी दोन क्रेनची भर
नवी मुंबई परिसरातील अनधिकृत होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने ही मोहीम आणखी तीव्र केली आहे. यासाठी शहरातील सहा विभागांमध्ये स्वतंत्र विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या कारवाईसाठी दोन स्वतंत्र क्रेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासकीय जागांवरील अतिक्रमणांची संख्या खासगी जागांच्या तुलनेत अधिक आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 203 होर्डिंग, एक हजार 356 बॅनर, 648 बोर्ड आणि 882 झेंडे हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान खासगी, तसेच शासकीय जागांवरील परवानगीविना लावण्यात आलेले फलक हटविण्यात आले. विभागनिहाय पाहता सातपूर आणि नवीन नाशिक विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. सातपूर विभागात मोठ्या प्रमाणात झेंडे आणि बोर्ड हटविण्यात आले, तर नवीन नाशिक विभागात होर्डिंग, बॅनर आणि बोर्डांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी व नाशिक रोड विभागातही नियमित मोहीम राबविण्यात आली.
Action taken on three thousand unauthorized billboards