अफगाणी सुफी संताची चालकाकडूनच हत्या

आर्थिक देवाणघेवाणमुळे तिघांच्या मदतीने काढला काटा
येवला/नाशिक : प्रतिनिधी
तालुक्यातील चिंचोडी येथील एमआयडीसीमध्ये अफगाणच्या सुफी संताची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्यानंतर पोलिसांना अवघ्या काही तासांतच यातील संशयितांना जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. आर्थिक देवघेव आणि संपत्तीसाठी अफगाणी संताच्या कारचालकानेच तिघा साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे. यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.
तालुक्यातील चिंचोडी एमआयडीसी परिसरात अफगाण सुपी सय्यद नांवाच्या संताची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनास्थळावरुन चार चाकी वाहनाने पळ काढला असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हल्लेखोरांचा शोध घेतला असता संताच्या कारवर असलेल्या चालकानेच तीनजणांच्या मदतीने हा कट रचल्याचे उघड झाले. अफगाणातून आलेल्या सुफी संत अहमद झरीफ चिश्ती याला निर्वासित असल्यामुळे स्वत:च्या नावावर संपत्ती खरेदी करता येत नव्हती. त्यामुळे त्याने ही संपत्ती तसेच गाडी दुसर्‍याच्या नावावर खरेदी केली होती. घटनेच्या दिवशी येवला शहरातील चिंचोली एमआयडीसी परिसरात बाबाची हत्या करण्यात आली. मंगळवारी (दि 5) प्लॉट खरेदी सह पूजनही करायचे असल्याचे सांगत बाबाच्या ड्रायव्हरने एमआयडीसीतील एका मोकळ्या भुखंडावर नेले. यावेळी ड्रायव्हरसोबत त्याचे तीन साथीदारही होते. भुखंडाचे पूजन होताच ड्रायव्हरने बाबाच्या डोक्यात गोळी घातली. त्यानंतर बाबाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, उपनिरीक्षक मनोहर मोरे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक लॅबतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, उपलब्ध माहितीनुसार शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या सोबत राहणार्‍या खान नामक व्यक्ती व दोघांना अटक करण्यात आली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून सदर हत्या झाल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. अफगाणिस्तान राजदूतला यासंदर्भात माहिती देण्यात येणार आहे. कागदपत्राची पाहणी व सर्व अकांउटची चौकशी करण्यात येईल. यावेळी अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *