खासदार संजय राऊत आजपासून तीन दिवसीय नाशिक दौर्‍यावर

नाशिक : प्रतिनिधी
शिंदे गटाकडे असलेल्या चाळीस आमदारांच्या मतदारसंघात असलेला दरारा आणि त्यांनी केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती पाहता तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नव्याने कंबर कसली असून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळेच आता खासदार संजय राऊत तीन दिवसीय नाशिक दौर्‍यावर आजपासून गुरुवार (दि. 7) येत आहे. यावेळी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्याच दिवसांच्या राज्यनाट्यानंतर अखेर महाराष्ट्राला एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मुख्यमंत्री मिळाले. शिंदे गट आणि भाजपाची सत्ता राज्यात आल्यानंतर आता शिवसेनेला लागलेली गळती थांबविण्यासाठी प्रयत्न असणार आहे. नाशिक शहरात अद्याप शिंदे गटाच्या बाजूने कोणीही गेलेले नाही त्यातच पालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. पक्षातील डॅमेज कंट्रोल भरून काढण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर येत आहे.यावेळी संजय राऊत ३ दिवस पदाधिकारी यांच्या बैठका घेणार आहे तसेच . राऊत  शुक्रवारी पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांच्या देखील बैठका घेणार आहेत. शनिवारी राऊत यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे . ३ दिवसीय नाशिक दौऱ्याच्या माध्यमातून पक्ष बांधणीला राऊत सुरूवात करत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते सत्तेतून पायउतार झाले. पक्ष संघटन टिकवण्यासाठी राऊत यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *