गटनेते केशव पोरजे : पाच कोटी विकास निधीचे आमिष
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दहा ते बारा नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या गळाला लागल्याची चर्चा समोर येताच शुक्रवारी (दि.10) नाशिकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान, आमच्या पक्षातील कोणीही नगरसेवक कुठेही जाणार नसल्याचा दावा महापालिकेतील गटनेते केशव पोरजे यांनी केला आहे.
नगरसेवक फुटणार असल्याची चर्चा समोर येताच उद्धव ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.10) मनपातील पक्षाच्या गटनेते कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी सर्व नगरसेवकांनी एकत्र जमून आपली एकजूट दाखवून दिली. यावेळी गटनेते पोरजे यांनी गंभीर आरोप करताना म्हटले की, आमचा कोणताही नगरसेवक फुटणार नाही. आम्ही सर्वजण एकत्र आहोत. मुद्दाम संशयाचे वातावरण तयार केले जात आहे. उपमहापौर पदाचा सौदा केला जात असून, ज्यांना उपमहापौर बनायचे आहे ते एजंट पाठवून आमच्या नगरसेवकांना पाच कोटींच्या प्रभाग निधीचे आमिष दाखवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. आतापर्यंत पाच ते सहा नगरसेवकांशी असा संपर्क साधण्यात आल्याचा गौप्यस्फोट पोरजे यांनी केला. एक वकील असलेला एजंट, ज्याला स्वतःला स्वीकृत नगरसेवक व्हायचे आहे आणि जो सध्या पक्षसंघटनेतही नाही, तो आमच्या नगरसेवकांशी संपर्क साधत आहे. आमची विकासकामांसाठी अडवणूक केली जात असून, आम्ही मनपा आयुक्तांना निधी देण्यासाठी निवेदन दिले आहे.
…तर ऑपरेशन तुडवा राबवू
काही दिवसांपूर्वी पक्षाचे खासदार फुटले तेव्हा ऑपरेशन तुडवा राबवण्यात आले. मात्र, नाशिकमध्ये कोणी नगरसेवक फुटल्यास त्यांना मतदार तुडवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा पोरजे यांनी दिला.
घरगुती कारणामुळे दोघा नगरसेवकांची अनुपस्थिती
महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे एकूण 15 नगरसेवक निवडून आले आहेत. यातील 13 नगरसेवक प्रत्यक्ष हजर होते. नगरसेविका मंगला आढाव यांच्या सासूबाईंचे निधन आणि मुरलीधर भामरे यांच्या चुलत्यांचे निधन झाल्यामुळे हे दोघे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, मुरलीधर भामरे यांच्या वतीने त्यांचे पुत्र तेजस भामरे पत्रकार परिषदेला उपस्थित होते, ज्यातून सर्व 15 नगरसेवक एकत्र असल्याचा संदेश देण्यात आला.
उद्धव ठाकरे गटाचे निवडून आलेले नगरसेवक
केशव पोरजे (गटनेते), प्रथमेश गिते, सीमा पवार, मंगला आढाव, शैलेंद्र ढगे, रुचिरा साळवे, योगेश भोर, भारती ताजनपुरे, वैशाली दाणी, योगेश गाडेकर, संजीवनी हांडोरे, मुरलीधर भामरे, माधुरी डेमसे, वैशाली दळवी (पाटील), प्रमिला मैद.
All corporators of the Thackeray faction are united.