मनपा आक्रमक; ठेकेदाराला 77 लाखांचा दंड
नाशिक : प्रतिनिधी
पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून शहरात गंगापूर धरणावरूरुन थेट जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. तब्बल 171 कोटी रुपये खर्चून महापालिकेच्या अंतर्गत सदर काम सुरू आहे. दरम्यान, मुदतीत काम न केल्याने महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला दणका देत तब्बल 77 लाखांचा दंड ठोठावला आहे. प्रशासनाने 1 ते 15 मे दरम्यान प्रतिदिन एक लाख रुपये, तर त्यानंतर 16 मेपासून प्रतिदिन अडीच लाख रुपये दंड आकारत आहे. त्यानुसार आतापर्यर्ंत मक्तेदाराला तब्बल 77 लाख 50 हजार रुपयांचा दणका दिला आहे.
जलवाहिनीचे काम केले जात असून, ते जिंदाल (जेडब्ल्यूएल) या कंपनीला देण्यात आले आहे. गंगापूर धरणावरून थेट जलवाहिनी विस्ताराचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. ठेकेदार वेळेत काम पूर्ण करू न शकल्याने मनपाने सप्टेंबर 2025 मध्ये मक्तेदारास 31 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ दिली होती. मुदतवाढ देऊनही सदर काम पूर्ण न झाल्याने मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून 1 मेपासून दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेने प्रारंभी एक लाख, तर आता दिवसाला थेट अडीच लाखाचा दंड आकारत आहे. शहराला प्रामुख्याने गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलून बारा बंगला जलशुद्धीकरण व शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोचवले जाते. तेथे पाण्यावर शुद्धीकरण केले जाते व पुढे घरोघरी पुरवठा होतो. 2017 ते 2000 या कालावधीत बाराशे मिलिमीटर व्यासाच्या दोन सिमेंटच्या पाइपलाइन टाकण्यात आल्या होत्या. नंतर शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे जलवाहिनीची क्षमता वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली. तसेच याआधीची जलवाहिनी जुनी झाल्याने पाणी गळतीचे प्रकार घडत असल्याचे दिसून येत होते. दरम्यान, गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान साडेबारा किलोमीटर लांबीची 800 मिलिमीटर व्यासाची लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतल्याने आता गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या जलवाहिनीचे काम लोखंडी पाइप टाकून केले जात आहे.
गंगापूर थेट जलवाहिनीचे काम करणार्या मक्तेदाराला मुदतवाढ देऊनही काम पूर्ण न केल्याने दिवसाला अडीच लाखाचा दंड ठोठावला आहे. दि. 1 ते 15 मेपर्यंत एक लाख रुपये व त्यानंतर 16 मेपासून प्रतिदिन अडीच लाख रुपये दंड आकारला जात आहे.
– रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा
Delay in water pipeline work